मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली असून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मात्र मुंबईमध्ये २० मे रोजी मतदान होत असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांना कसे थांबवायचे असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेडसावू लागला आहे. मुंबईस्थित मराठी भाषक महाराष्ट्रातील आपल्या गावी जातात. मात्र परप्रांतीय मंडळी मुंबईतच असतात. परिणामी, मतदानापर्यंत आपली मतपेढी मुंबईतच टिकून राहावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी अस्सल मराठमोळा भाग असलेल्या मुंबईमधील मराठी टक्का घसरला आहे. मात्र मराठी मतदारांची मते निवडणुकांमध्ये निर्णायकी ठरत आहेत. मुंबईमधील गिरगाव, परळ, लालबाग, शिवडी, वरळी, दादर आणि उपनगरांतील काही भाग शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणूनच ओळखले जातात. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडानंतर स्थानिक पातळीवरील काही मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्या गटाची वाट धरली. काँग्रेसला रामराम ठोकत माजी खासदार मिलिंद देवरा आपल्या समर्थकांसह शिंदे गटात दाखल झाले. मात्र, असे असले तरी आजही मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समर्थकांची फौज मोठी आहे.

हेही वाचा – दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार येत्या २० मे रोजी मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच बहुसंख्य मराठी भाषक आपापल्या गावची वाट धरतात. ही सर्व मंडळी मेच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी मुंबईत दाखल होतात. अशा मंडळींची संख्या मुंबईत मोठी आहे. मात्र उन्हाळ्यातील पाण्याची चणचण लक्षात घेऊन बहुसंख्य परप्रांतीय मंडळी मुंबईतच राहणे पसंत करतात. त्यामुळे २० मे रोजी परप्रांतीय मतदार मोठ्या संख्येने मुंबईतच असतील, पण त्याच वेळी मराठी मतदार मात्र गावी असण्याची दाट शक्यता आहे.

मराठी मतदारांना मतदानासाठी मुंबईत कसे थांबवता येईल याचा विचार पक्ष पातळीवर सुरू झाला आहे. त्यासाठी मतदारांना स्थानिक समाज माध्यमाध्यमावर साद घालण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

‘गावी जा, पण मतदानाला या’

मुलांची परीक्षा संपल्यावर लगेच गावाला जा, पण मतदानासाठी २० मेपूर्वी मुंबईत या किंवा मतदान झाल्यानंतर गावाला जा, असे आवाहन समाजमाध्यमावरून करण्यात येत आहे. या मतदारांना मतदानासाठी मुंबईत थांबविण्यासाठी आणखी काही करता येईल का याचाही विचार पक्ष पातळीवर सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to stop the voters going to the village new headache for political parties ahead of lok sabha elections mumbai print news ssb