मुंबई : राज्य पोलिसांनी तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यासाठी तयारी केली आहे. आजपासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा लागू होणार आहेत. ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहिता १८६०, सीआरपीसी तसेच पुरावा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने पोलीस अधिकाऱ्यांना जुन्या कायद्यांकडून नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यात मदत करण्यासाठी ‘गुन्हे माहिती पुस्तिका’ सर्व पोलीस ठाणी व विभागांना वितरीत केली आहे. या पुस्तिकेसह राज्य पोलिसांनी गंभीर गुन्हे, महिला आणि मुलांविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेचे गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हे, दहशतवादी कृत्ये आणि अपघातांना सामोरे जाण्यासाठी तपशीलवार मानक कार्यप्रणाली लागू केल्या आहेत. या पुस्तिकेच्या स्वरुपात प्रणालीचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करताना कलमे आणि तपासाबाबत होणारा गोंधळ सहज टाळता येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय स्थानिक पातळीवरही मार्गदर्शक पुस्तिकांचे वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा – सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव… प्रशासनात महिलाराज

मुंबई पोलीसही आजपासून नवीन कायद्यांची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ३० हून अधिक प्रशिक्षण सत्रांमध्ये १८०० अधिकारी व आठ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. पोलीस ठाण्यात नवीन कायद्यांनुसार नोंद करण्यासाठी तुलनात्मक तक्ते व नोंद वह्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन कायद्यांच्या मार्गदर्शनासाठी सॉफ्ट कॉपीही पोलीस ठाण्यांना वितरीत करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पोलिसांना समजण्यास सोपे व्हावे, म्हणून नवीन कायद्यांची मराठी माहितीही सर्व विभागांना देण्यात आली आहे.

मुंबईतही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून नवीन कायदे लागू करण्याबाबत तयारी सुरू आहेत. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. याशिवाय ऐच्छिक मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – शेतकऱ्यांना मोफत वीज; महावितरणलाच दिलासा

जून्या व नव्या कायद्यांमधील कलमांमधील ठळक बदल
गुन्हे – जून कायदा (भादंवि) – नवीन कायदा (भा.न्या.सं)

हत्या – ३०२ – १०३(१)

हत्येचा प्रयत्न – ३०७ – १०९

बलात्कार – ३७६ – ६४

सामुहिक बलात्कार – ३७६(ड) – ७०(१)

विनयभंग – ३५४ – ७४

अपहरण – ३६३ – १३७(२)

फसवणूक – ४२० – ३१८(४)

अ‍ॅसिड हल्ला – ३२६(अ) – १२४(१)

खंडणी – ३८४ – ३०८(२)

दरोडा – ३९५ – ३१०(२)

चोरी – ३७९ – ३०३(२)

सदोष मनुष्यवध – ३०४ – १०५

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How will the new laws be implemented police ready mumbai print news ssb