ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलंय. “आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छा नाही,” असं स्पष्ट मत ह्रदयनाथ मंगेशकरांनी व्यक्त केलं. तसेच राजकारणी लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असं आवाहनही केलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, “भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दीदी हिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छाच नाही.”

“दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये”

“आमचं म्हणणं आहे की शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून राजकारणी लोकांचा जो वाद चालला आहे तो त्यांनी कृपया बंद करावा. दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये,” असं ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं.

“दीदीच्या संगीत स्मारकापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक नाही”

ह्रदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने दीदीला लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापने करण्याचं आश्वासन दिलं होतं. स्वतः लता मंगेशकरांनी त्यांना त्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही मागणी अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केली आहे. दीदीचं संगीत स्मारक होतंय यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही.”

हेही वाचा : कियारा अडवाणी- करण जोहरवर रागावले होते मंगेशकर कुटुंबीय, वाचा काय होतं कारण

“श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने एक संगीत पर्व संपलंय. एक युगांत झालाय,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hridaynath mangeshkar comment on dispute over memorial of lata mangeshkar on shivaji park pbs