परीक्षा सुरू होण्याआधीच प्रश्नपत्रिका ‘व्हॉट्सअॅप’वर
आपल्या परीक्षांच्या चोख आयोजनाबाबत पाठ थोपटून घेण्याची परिस्थिती ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’त राहिली नसून लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी मंडळाचा बारावीचा वाणिज्य शाखेचा ‘बुक कीपिंग अॅण्ड अकाउंटन्सी’ हा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा सुरू होण्याआधीच या विषयाची प्रश्नपत्रिका ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध होती. परीक्षांचे अत्यंत काटेकोर पद्धतीने आयोजन अशी ख्याती असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या प्रतिमेलाच यामुळे तडा गेला असून या विषयाच्या परीक्षार्थीना फेरपरीक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता या विषयाची परीक्षा सुरू व्हायची होती. परंतु, मुंबईतील काही विद्यार्थ्यांना साधारणपणे पाऊण तास आधीच ‘बुक कीपिंग अॅण्ड अकाउंटन्सी’ या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध झाली होती. काहींनी हा प्रकार विलेपार्ले येथील आपल्या कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी या प्रकाराला वाचा फोडण्याकरिता प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींना व्हॉट्सअपवरच प्रश्नपत्रिका पाठवून दिली. या प्रतिनिधींनी परीक्षा सुरू होण्यास काही मिनिटांचा अवकाश असताना मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही ही व मूळ प्रश्नपत्रिका सारखीच असल्याचे आढळून आले. ‘लोकसत्ता’कडे परीक्षा सुरू होण्याआधी म्हणजे १०.४०लाच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली होती, हे स्पष्ट करणारी स्क्रीन शॉट्स छायाचित्रेच उपलब्ध आहेत. अर्थात काही विद्यार्थ्यांना १०.२० वाजताच व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली होती. महत्त्वाचे म्हणजे याच विषयाची प्रश्नपत्रिका गेल्या वर्षीही साधारणपणे या पद्धतीने मालाड येथील महाविद्यालयात फुटली होती. वाणिज्य शाखेसाठी अनिवार्य असलेल्या या १०० गुणांच्या परीक्षेला तब्बल तीन लाखांच्या आसपास विद्यार्थी बसतात. परंतु, पेपर फुटल्याने या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या परीक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ याच नव्हे तर ‘महत्त्वाचे प्रश्न’ म्हणून आधी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधी व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये फिरत होत्या. मात्र, याबाबत ठोस पुरावा नसल्याने पेपर फुटला आहे की नाही हे सिद्ध करणे कठीण आहे, असे एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या प्रकारच्या चर्चा आजकाल दरवर्षीच रंगत असतात. असे प्रकार घडत असतील तर तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे. सरकारने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन उपाययोजना कराव्या, अशी प्रतिक्रिया ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’चे उपाध्यक्ष नरेंद्र बाबवानी यांनी व्यक्त केली.
बारावीचा ‘बुक कीपिंग आणि अकाऊंटन्सी’चा पेपर फुटला!
परीक्षा सुरू होण्याआधीच प्रश्नपत्रिका ‘व्हॉट्सअॅप’वर
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-03-2016 at 01:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc account examination paper leaked on whatsapp