दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास सुरू केला आहे, मात्र अभ्यासासाठी इच्छा आणि तयारी असतानादेखील रॉकेलच्या दिव्याखाली अगदीच दुसऱ्या वस्तीत राहणाऱ्या मित्रांच्या घरी अभ्यास करण्याची वेळ दामू नगर भागातील विद्यार्थ्यांवर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी अग्नितांडवात सुमारे अडीच हजार झोपडय़ा बेचिराख झाल्या. यामध्ये हजारो कुटुंबांची वातहत झाली मात्र शासकीय आश्वासनानंतर आज तीन महिने झाले तरी तेथे वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या झोपडपट्टीतील दहावी-बारावीच्या मुलांना रस्त्याच्या दिव्याखाली किंवा नातेवाईकांकडे जाऊन अभ्यास करावा लागत आहे. तर कित्येक कुटुंबे दुसरीकडे भाडय़ाने घर घेऊन राहत आहेत. आगीमध्ये आमची सर्व वह्य़ा-पुस्तकांची राख झाली, कित्येक संस्थांनी आम्हाला गणवेशापासून दप्तरांपर्यंत सर्व शैक्षणिक साहित्य पूरविले मात्र वीज नसल्याने आम्ही अभ्यास करू शकत नसल्याचे दामू नगरच्या मुलांचे दु:ख आहे.
दामू नगरमध्ये राहणारी अफसाना शेख या मुलीची येत्या मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र घरामध्ये वीज नाही, घरातील कामासाठी पाणी लांब जाऊन आणावे लागते. घरात स्वच्छतागृह नसल्याने वस्तीच्या बाहेरच पत्रे लावून आंघोळीसाठी जागा तयार केली आहे. त्यासाठीदेखील अंधार होण्याची वाट पाहावी लागते. गेले तीन महिने हीच अवस्था असल्याने दिवसा अभ्यास करून रात्रीच्या वेळी दुसऱ्या वस्तीत अभ्यासाला जावे लागत असल्याचे ती सांगते. तिच्यासोबत येथील कित्येक मुलेही शाळेत व महाविद्यालयात शिकत आहेत, मात्र साडय़ांचा आणि प्लास्टिकच्या भिंतींचा तात्पुरता निवारा करून आम्ही दिवस ढकलत असल्याचे ती सांगते. याशिवाय सचिन चुवाळे या मुलाची बारावीच्या परीक्षा सुरू असून दिवसा परीक्षेला गेल्यावर रात्री दुसऱ्या वस्तीतील मित्रांच्या घरी किंवा घरात रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करीत असल्याचे तो सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा