मुंबई : बनावट वाहन क्रमांकांची पाटी बसवून, तसेच वाहन क्रमांकाच्या पाटीवर करण्यात येणारी छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर ही पाटी बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रासाठी मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता बुकींग पोर्टलवरील संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. वाहनधारकांनी वेळ आरक्षित करून त्यांच्या सोईप्रमाणे वाहन क्रमांक पाटी बसवून घ्यावी. वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तर त्यास ही वाहन क्रमांक पाटी बसविणे आवश्यक आहे.
वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर ही वाहन क्रमांक पाटी बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांच्या पोर्टलवर, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करू शकतात. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी वाहन क्रमांक पाटी असलेल्या वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मुंबई (मध्य)ने दिला आहे.