सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी नवाब मलिक यांची सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुर्ल्यातील रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा >>> मुंबई: घराची भिंत कोसळून महिला जखमी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जमीन मिळावा यासाठी अनेक महिन्यापासून त्यांचे न्यायालयात प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. शनिवारी आणि रविवारी न्यायालय बंद असल्याने आज मलिक यांची सुटका होणार आहे. त्यामुळे सकाळपासून त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यानी कुर्ल्यातील खासगी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. हातात फलक घेऊन कार्यकर्ते ते बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. सध्या राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक कुठल्या गटात जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र साहेब कुठल्याही गटात जावो, आम्ही त्यांच्या सोबत कुठेही जाऊ अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.