मुंबई : यंदा करोना निर्बंधमुक्त वातावरणात मुंबईत गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी, खेतवाडी आणि आसपासच्या परिसरांत सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी तर भाविकांची गर्दी होत असून रविवारी (४ सप्टेंबर) सुटीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी होती. यामध्ये राजकीय नेते आणि कलावंतांचाही समावेश होता.
करोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला. मात्र यंदा करोना संसर्ग नियंत्रणात असल्याने निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे मुंबईतील लालबाग, परळ, चिंचपोकळी, खेतवाडी आणि परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत. सुट्टीचा दिवस असल्यामुळे रविवारी मोठय़ा संख्येने भाविक या परिसरात आले होते.
लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’, गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’, ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, गिरगावमधील एस. व्ही. सोहनी पथ येथील ‘गिरगावचा राजा’, मुगभाटमधील ‘गिरगावचा महाराजा’ आदी ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच बॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टी, मराठी मालिकांतील अभिनेते व अभिनेत्रींसह आणि राजकीय नेत्यांनीही रविवारी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लालबागमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली.
सर्वसामान्यांना फटका.. राजकीय नेते, अभिनेते-अभिनेत्री यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्तींनी गणेश दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे अनेक ठिकाणी सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत होते. त्याचबरोबर भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. काही रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसत होती.