मुंबई : करोना विषाणू साथीचा दोन वर्षांचा काळोख सरल्यानंतर आलेल्या पहिल्याच दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये रविवारी चैतन्य संचारले होते. चढत्या महागाईवर ग्राहकांच्या उत्साहाने मात केल्याचे चित्र मुंबई, ठाण्यासह सर्वच बाजारपेठांमध्ये होते.
मुंबई, ठाण्यासह सर्वच शहरांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी सहकुटुंब रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधला. मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसर, मशीद बंदर, दादर, तर ठाण्यातील राममारुती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी मैदान या मुख्य बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. कल्याण, डोंबिवली शहरांतही खरेदीचा उत्साह होता.
दोन वर्षांच्या निरुत्साही वातावरणानंतर रंगीबेरंगी दिवे, माळा, आकाशकंदील यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दादर, लालबाग, शीव, मंगलदास मार्केट, क्रॉफर्ड मार्केट यांबरोबरच उपनगरातील स्थानिक बाजारही रविवारी दिवाळी साहित्याने फुलले होते.
रंग, रांगोळी, आकाशकंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य, दिवे, माळा, लक्ष्मीच्या मूर्ती, किल्ले, त्यावरील मावळय़ांची चित्रे, केरसुण्या, पूजेचे साहित्य, फराळ आदी साहित्य विकणारे फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा अवतरले आहेत. कपडे खरेदीलाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद होता. स्थानिक बाजारांबरोबरच मॉल्स, ब्रँडेड दुकानांमध्येही गर्दी होती.
महागाईच्या झळा सोसूनही..
श्रावणापासून सणोत्सवांनिमित्त होणाऱ्या खरेदीचा श्रीगणेशा केला जातो आणि दिवाळीत खरेदीचा कळसाध्याय गाठला जातो. अन्य महिन्यांपेक्षा दिवाळीच्या महिन्यात बोनस, सानुग्रह अनुदान, उचल या रूपाने नोकरदार वर्गाला थोडी अधिक अर्थप्राप्ती होते. त्यामुळे दीपोत्सव हा एका अर्थाने सर्वासाठी खरेदीचा महोत्सवच असतो. अनेक जण नवे कपडे घेतात आणि घरात नव्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही आगमन होते. यंदा भाववाढीमुळे खिशाला बसणारी महागाईची झळ सोसून अधिकाधिक किफायतशीर पर्यायांचा शोध घेत खरेदी केली जात असल्याचे दिसते.
वाहनांची कासवगती..
कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रोषणाईचे साहित्य आदींच्या खरेदीसाठी अनेक जण मोटारसायकली आणि चारचाकी मोटारींसह बाजारात आल्याने बाजारपेठांमधील मार्गावर वाहतूक कोंडी झाली. शहरे आणि उपनगरांच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईत वाहने उभी करण्यासाठी चालकांना बाजारपेठेपासून पाच ते दहा किलोमीटर दूर जावे लागत होते. अनेक मॉल्स, मोठय़ा दुकानांच्या वाहनतळावरही वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे ग्राहकांना जागा मिळेपर्यंत वाट पाहावी लागत होती.