मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुचर्चित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून या पार्श्वभूमीवर ‘छावा’ कादंबरीचा खप पूर्वीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे.
दुकानांमध्ये आणि पदपथावरील पुस्तकांच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसू लागली आहे. ‘छावा’ कादंबरी वाचण्याची रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या कादंबरीसाठी विचारणा केली जात आहे. यापूर्वी आम्ही ‘छावा’ कादंबरीच्या महिन्याला ५० प्रती विकायचो. मात्र आता गिरगाव, दादर आणि ठाणे या प्रत्येक शाखेतून आठवड्याला ५० ते ६० प्रती विकल्या जात आहेत. ‘छावा’ कादंबरीची जुनी आवृत्ती संपल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे सांगण्यात आले.
शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये असलेले आकर्षण आणि ‘छावा’ कादंबरी वाचण्याची उत्सुकता, तसेच वाढती मागणी लक्षात घेऊन मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे नवीन मुखपृष्ठासह ‘छावा’ कादंबरी आणण्यात येत आहे. जुन्या आवृत्तीनुसार ‘छावा’ कादंबरीची किंमत ७५० तर विशेष आवृत्तीनुसार ही किंमत ६२५ रुपये आहे. बिगर मराठी भाषिकांसाठी कादंबरीची इंग्रजी आवृत्ती दोन आठवड्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तकांना मोठी मागणी आहे’, असे मॅजेस्टिक बुक डेपोच्या आशय कोठावळे यांनी सांगितले.
संभाजी महाराजांवरील पुस्तके
छावा – शिवाजी सावंत, संभाजी – विश्वास पाटील, छत्रपती संभाजी महाराज – वा. सी. बेंद्रे, ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे, रणझुंझार, शंभुछत्रपतींच्या समशेरीची गाथा – डॉ. सदाशिव शिवदे, राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे – नऊ इतिहास अभ्यासक, श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथ – सुशांत उदावंत, छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान – मेधा देशमुख – भास्करन, शिवपुत्र – राजकुंवर बोबडे, छत्रपती संभाजी महाराज – गोविंद सरदेसाई, शिवपुत्र संभाजी – डॉ. कमल गोखले, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेतील ग्रंथ बुधभूषण आदी विविध पुस्तकांना मोठी मागणी आहे.