मुंबई : इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी एसटीचे आगाऊ तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांकडूनही तिकिटाचा वाढीव दर वसूल करण्यासाठी, प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड विलंबयातना सहन कराव्या लागल्या. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. ही दरवाढ २५ जानेवारीपासून लागू झाली. मात्र, या दरवाढीची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसली आहे.

वाहक-प्रवाशांमध्ये खटके उडण्याची शक्यता

अनेक ठिकाणी सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये खटके उडाले. एसटीची नवीन भाडेवाढ ही सम प्रमाणात व्हायला हवी होती. परंतु, ती विषम प्रमाणात झाल्यामुळे एक, दोन रुपयांची वाढ तिकीट दरात झाली.

एसटीचा बहुतांश प्रवासी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ऑनलाइन पैशाचा व्यवहार करायला अडचणी येतात. नव्या दराप्रमाणे पूर्ण तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ आणि अर्धे तिकीट ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६, ५१, ५६ असे झाले आहे. पूर्वी भाडे पाच रुपयांच्या पटीत होते.

नवीन भाडेवाढीमध्ये ते एक रुपयांच्या पटीत केले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना अतिरिक्त एक रुपया खिशात ठेवावा लागणार आहे.

सरकारकडून सर्मथन, मात्र विरोधकांची टीका

चांगल्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे. महामंडळ कसे चांगले चालेल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी भाडेवाढीचे सर्मथन केले आहे. प्रवाशांवर अन्याय होणार नाही, याची हमी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महामंडळातील दोन हजार कोटी रुपयांचा होणारा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

प्रवाशांनी १०, १५, २५, ५० रुपये दिल्यानंतर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास वाहक-प्रवाशांमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तत्काळ बदल करावा.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

एसटी महामंडळातील शिवनेरीवगळता इतर बस खिळखिळ्या झाल्या आहेत. बसची कमतरता असल्याने अनेक प्रवासी मार्ग बंद करावे लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. भाडेवाढ सामान्य प्रवाशांकरिता खूप अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रवासी भाडेवाढ संदर्भात फेरविचार करावा.– दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ

पुण्याला जाण्यासाठी २५ जानेवारी रोजीची सकाळी १०.०१ च्या बोरिवलीवरून शिवनेरी बसचे तिकीट २४ जानेवारीला आरक्षित केले. मात्र, २५ जानेवारीला तिकीट दरात वाढ झाल्याने आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून तिकिटाची वाढीव रक्कम वसूल करण्यात आली. सकाळी १० वाजता बोरिवलीहून निघालेली बस पुण्यात दुपारी १.३० वाजता पोहचणे अपेक्षित होते. मात्र १.३० च्या दरम्यान बस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होती. एसटी महामंडळाच्या तिकीट वसूल करण्याच्या पद्धतीमुळे प्रवाशांना विलंब झाला. – रुजुता विश्वासराव, प्रवासी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge displeasure among passengers over st fare hike mumbai news amy