महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध पावलेल्या दिवंगत पुलं देशपांडे यांच्यावर रसिक अजूनही किती प्रेम करतात याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा एकदा आला. ‘पुलं दर्शन’ कार्यक्रमासाठी रसिकांची इतकी अलोट गर्दी उसळली की काहींना आसनांच्या मधल्या जागेत जमिनीवर बसावे लागले तर तर काहींना पूर्णवेळ उभे राहावे लागले. पण ‘पुलं’वरील प्रेमापोटी हे सारे सहन करत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
पु. ल. देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘पुलं दर्शन’ हा कार्यक्रम झाला. त्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर हाऊसफुल्ल झाले. पण पुलंवरील प्रेमपोटी आसनांच्या मधील मोकळय़ा जागेत बैठक मारत, काहींना थेट व्यासपीठाचे कोपरे गाठले. तर अनेकांनी दीड ते दोन तास उभे राहून यावेळी दाखवण्यात आलेला ‘या सम हा’ हा लघुपट पाहिला.
पु. ल. देशपांडे अमृत महोत्सव समितीने तयार केलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन सुधीर मोघे व मुक्ता राजाध्यक्ष यांनी केले होते. साहित्यिक, नाटककार, संगीतकार, अभिनेते, एकपात्री प्रयोग सादरकर्ते अशा पु. लं.च्या विविध पैलूंचे दर्शन या लघुपटात घडले.
माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, विजया मेहता, मं. वि. राजाध्यक्ष, जयवंत दळवी, आदींनी पुलंविषयी व्यक्त केलेले मनोगत या लघुपटात समाविष्ट करण्यात आले होते. तर विक्रम गोखले, चंद्रकांत गोखले, दिलीप प्रभावळकर, जयंत सावरकर, यांनी पुलंच्या विविध नाटकातील प्रवेशही या लघुपटात पाहायला मिळाले. लघुपटाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ‘ती फुलराणी’ या नाटकातील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या भक्ती बर्वे यांच्या प्रवेशाला रसिकांनी जोरदार टाळय़ांची दाद दिली.
‘वाऱ्यावरची वरात’, ‘बटाटय़ाची चाळ’ यातील काही प्रसंग तसेच मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू यांच्या कवितांवर पुल आणि सुनीताबाई सादर करत असलेल्या कार्यक्रमांची झलक यात रसिकांना पाहायला मिळाली. वंदे मातरम, पुढचं पाऊल, गुळाचा गणपती या चित्रपटांमधील पुलंच्या अभिनयालाही दाद मिळाली. विलेपार्ले येथील पुलंचे लहानपण, व्यक्ती आणि वल्लीतील काही व्यक्तिचित्रे, चित्रपटाला दिलेले संगीत याविषयी दस्तुरखुद्द पुलंनी व्यक्त केलेले मनोगत या लघुपटात होते. ‘आपल्याला मिळणारा आनंद हा लोकांमध्ये वाटावा याच उद्देशाने आपण लेखन केले व त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली’ या पुलंच्या भूमिकेलाही उपस्थितांनी दाद दिली. या कार्यक्रमापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. ‘एक होता विदूषक’ या सिनेमाने कार्यक्रमाची सांगता झाली.