ठाणे जिल्हयातील मुंब्रा-शीळ मार्गावर दोन महिन्यात बांधलेले निकृष्ट अनधिकृत बांधकाम कोसळून ७४ रहिवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांनी आता आपला मोर्चा रायगड जिल्हयातील नयना (नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अ‍ॅफेकटेड एरिया) क्षेत्रातील जमिनीकडे वळविला आहे. राज्य शासनाने नुकतेच या क्षेत्रासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली असून ते क्षेत्र सध्याच्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या रहात असल्याची तक्रारी अधिकृत इमारती बांधणाऱ्या व्यवसायिकांनी सिडकोकडे केल्या आहेत.
पनवेल तालुक्यातील नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात राज्य शासनाने सहा महिन्यापूर्वी प्रभावित क्षेत्र जाहीर केले आहे. ही हद्द ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची आहे. सिडकोच्या विद्यमान ३४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापेक्षा हे दुप्पट क्षेत्रफळ आहे. पूर्वे बाजूस माथेरन डोंगराच्या पायथ्यापासून ते पश्चिम बाजूस पेण नगरपालिकेपर्यंत ही हद्द विस्तारलेली असून यात खोपोली, खालापूर नगरपालिकेच्या हद्दीपर्यंतच्या क्षेत्रफळाचा समावेश आहे. सर्वसाधारपणे विमानतळापासून वीस किलोमीटरचा परिघात या क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आला आहे. गाव, गावठाण पर्यंत आतापर्यत बांधकामे मर्यादीत असणाऱ्या या गावांच्या वेशीबाहेर अलीकडे मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाल्याची बाब सिडकोच्या निर्दशनास आली आहे.
मुंब्रा-शीळ-डायघर मार्गावर चार मजल्याची अनधिकृत इमारत पत्तासारखी कोसळून मोठी जीवीतहानी झाल्याने अशी अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांनी आपला मोर्चा रायगड जिल्हयातील या भागाकडे वळविला आहे. या ठिकाणी सध्या रातोरात इमारती उभ्या रहात असून ही जमिन यानंतर आपल्या हातात राहणार नाही, अशी समजूत झाल्याने ग्रामस्थांनी त्या बडय़ा किमंतीत विकण्याचा सपाटा चालविला आहे.
सुमारे पाच हजार बांधकामे या क्षेत्रातील २७० गावांच्या आजूबाजूला उभ्या रहात आहेत. सिडकोला या क्षेत्राच्या नियोजनाचे अधिकार दिले असून जमिन संपादनाचे नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही ग्रामस्थ या जमिनी विकत असल्याची बाब उघडीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge illegal building construction work near navi mumbai airport land
Show comments