बाळासाहेबांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या रात्रीपासून येऊ लागल्याने मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. मातोश्रीबाहेर व्हीआयपींची ये-जा आणि शिवसैनिकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. निमलष्करी दल या भागात तैनात करण्यात आले आहे. शीघ्र कृतीदलाच्या तीन कंपन्या मुंबईत तैनात करण्यात आल्या असून, त्यापैकी एक मातोश्रीबाहेर ठेवण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकडय़ा मागविण्यात आल्या असून, त्यापैकी तीन तुकडय़ा मातोश्रीबाहेर आहेत. तसेच सुमारे तीनशे पोलीस कर्मचारी मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. याशिवाय विशेष शाखेचे पोलीसही साध्या वेशात गर्दीमध्ये तैनात करण्यात आले आहेत. सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून संपूर्ण मुंबईत अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मध्य मुंबई आणि वांद्रे परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रीपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. रात्री पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग बीकेसी पोलीस ठाण्यात हजर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, तर सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत. यामुळे मातोश्री परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत होते. मातोश्रीकडे मुंबईबाहेरून, विशेषत: कोकणातून मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिक येण्याची शक्यता गृहीत धरून महामार्ग पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा