गेल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसात मुंबईतील रस्ते खड्डेमय होण्यास सुरुवात झाली असून केवळ १० दिवसांमध्ये ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने खड्डे पडले असताना पालिकेच्या पॉटहोल ट्रेकिंग यंत्रणेवर केवळ १०५५ खड्डय़ांची नोंद झाली आहे. त्यांपैकी केवळ ४४३ खड्डे बुजविण्यात पालिका यशस्वी झाली आहे. मुंबईकरांना गेल्या वर्षभरात दोन हजार कोटी रुपये खर्च करून खड्डेमुक्त गुळगुळीत रस्ते देण्यात पालिका अपयशी ठरली असून मुंबईकरांचे कोटय़वधी रुपये खड्डय़ात जाण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी पावसाच्या तडाख्यात रस्त्यांची चाळण झाल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले होते. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याऐवजी शहरातील शेकडो रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली. त्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांना देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी बहुसंख्य रस्त्यांची कामे कंत्राटदारांनी पूर्ण केली. मात्र पावसाच्या पहिल्याच तडाख्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडू लागले. अनेक छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवर खड्डय़ांची रांगोळी दिसू लागली आहे. तर आताच दुरुस्त केलेल्या काही रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. भांडूप येथे दुरुस्त केलेल्या एका रस्त्यावरील डांबरच वाहून गेले आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्याची ही दैनावस्था झाल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.
रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने पॉटहोल ट्रेकिंग यंत्रणेचा अवलंब केला आहे. या यंत्रणेद्वारे मोबाइलवरून काढलेले खड्डय़ाचे छायाचित्र थेट पालिकेच्या संगणकावर अभियंत्यांना उपलब्ध होते. त्यानंतर अभियंत्यांमार्फत खड्डय़ाच्या दुरुस्तीचे नियोजन करून तो भरण्यासाठी कंत्राटदाराकडे सोपविला जातो.
खड्डा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा त्याचे छायाचित्र यंत्रणेवर उपलब्ध होते. या यंत्रणेमुळे नागरिकांनाही आपल्या मोबाइलवरून खड्डय़ांचे छायाचित्र पालिकेकडे पाठवून त्याच्या दुरुस्तीसाठी तक्रार करणे शक्य झाले आहे. गेल्या १० दिवसांमध्ये पालिकेच्या या यंत्रणेवर १०५५ खड्डय़ांची नोंद झाली आहे. पालिका अभियंत्यांनी त्यांपैकी ८६५ खड्डय़ांचे नियोजन केले असून दुरुस्तीसाठी ६७३ खड्डे कंत्राटदारांकडे सोपविण्यात आले आहेत. आतापर्यंत त्यांपैकी केवळ ४४३ खड्डे बुजविण्यात आले असून ६१२ खड्डे ‘जैसे थे’ आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा