मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, नवीमुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शीव-पनवेल महामार्गाची चाळणी करण्यास सुरूवात केली आहे. या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असून, दुचाकी घसरणे, अपघात होत आहे.

शीव-पनवेल महामार्ग हा पूर्वी पूर्णपणे डांबरी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्याची मोठी दुर्दशा होत असे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे बाराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून या मार्गावरील अनेक रस्ते पूर्णपणे सिमेंटचे तयार केले. तर डांबरी रस्त्यांची देखील योग्य डागडुजी केली होती. परिणामी गेल्या पाच ते सहा वर्षांत या मार्गावरून वाहनांचा वेग सुसाट होता. मात्र यावर्षी पावसाळा सुरू होताच उड्डाणपुलावरील डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी पुन्हा एकदा मार्गावर वाहतूक कोंडी सुरू झाली असून त्याच मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके; कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेते १ सुवर्ण व ३ रौप्य पदकांची कमाई

शीव येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मानखुर्द येथील दोन्ही उड्डाणपूल, मानखुर्द टी जंक्शन, वाशी उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल, नेरुळ उड्डाणपूल, बेलापूर उड्डाणपूल येथे खड्डे पडले आहेत. तर पनवेलहुन मुंबईच्या दिशेने येताना, नेरूळ उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल, वाशीतील दोन्ही उड्डाणपूल, मानखुर्द टी जंक्शन, मानखुर्द रेल्वे स्थानक आणि मानखुर्द रेल्वे उड्डाणपूल यांची अवस्थाही दयनीय झाली आहे.

मानखुर्द मानखुर्द टी जंक्शन आणि मानखुर्द रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डयांमुळे याठिकाणी सध्या दिवसभर मोठी कोंडी होते. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने काही महिन्यांपूर्वी याठिकाणी एक लहानसा उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या या दोन्ही मार्गावर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. मात्र दर्जाहीन कामामुळे थोड्याशा पावसातच या उड्डाणपुलावरील डांबर पूर्णपणे निघून गेले असून सध्या संपूर्ण रस्त्याची खडी बाहेर पसरली आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील पावसाची माहिती ॲपवर; आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची निर्मिती

नव्या पुलाचीही दुरवस्था अशीच परिस्थिती तुर्भे उड्डाणपुलाचीही आहे. पनवेलवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर काही महिन्यांपूर्वी एक नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र काहीशा पावसानंतर तेथील संपूर्ण रस्त्यावरील खडी वाहून गेली असून अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पनवेल ते चेंबूर हे अंतर अवघे ४० ते ५० मिनिटांचे असताना खड्ड्यांमुळे तेच अंतर कापण्यासाठी सध्या वाहन चालकांना सव्वा तासांचा अवधी लागत आहे.