मुंबई : २०१८ ते २०२२ जवळपास चार वर्षांहून अधिक काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहात अॅक्शनपॅक्ड भूमिकेसाठी अभिनेता शाहरूख खानची घेतलेली मेहनत ‘पठाण’च्या रूपात फळाला आली. त्याच्या या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता पहाटेचा आणि मध्यरात्रीचा असे आणखी दोन खेळ वाढवण्यात आले आहेत.
यशराज प्रॉडक्शनच्या ‘गुप्तहेर चित्रपट’ मालिकेतील तिसरा आणि शाहरूख खानचा ‘अॅक्शन’ भूमिकेतील पहिला चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी देशभरात प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीला पाच हजार चित्रपडद्यांवर हा चित्रपट प्रदर्शित केला. मात्र चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद आणि चित्रपट पाहिल्यानंतर झालेली चर्चा लक्षात घेऊन या चित्रपटाचे खेळ वाढवण्यात आले आहेत. आता हा चित्रपट दिल्ली एनसीआर, मुंबई अशा प्रमुख शहरांसह देशभरात एकूण साडेआठ हजार चित्रपडद्यांवर दाखवण्यात येणार आहे. याशिवाय, दिल्ली आणि मुंबईत या शोचे सकाळी ६ आणि ७ वाजताचे शो तसेच मध्यरात्री साडेबाराचा शोही वाढवण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर शाहरूखचे रुपेरी पडद्यावर झालेल्या पुनरागमनाचे त्याच्या चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी शाहरूखच्या छायाचित्राला केक भरवण्यापासून दुधाचा अभिषेक करण्यापर्यंत नानाविध प्रकारे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आत्तापर्यंत केवळ रजनीकांत यांच्या चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी पोस्टरला अभिषेक करण्यात येत असे, मात्र यंदा पहिल्यांदाच शाहरूख खानच्या चाहत्यांनीही आपल्या आवडत्या कलाकाराप्रति प्रेम व्यक्त केले.
करोनाकाळात झालेले बॉलीवूडचे नुकसान आणि त्यानंतर ‘बॉयकॉट’ तसेच वेगवेगळय़ा वादांचा सामना करणाऱ्या कलाकारांसाठी ‘पठाण’ ही सुखद पर्वणी ठरली असल्याचे विश्लेषक तरन आदर्श यांनी म्हटले आहे.
डोंबिवलीतील फलक हटविला
डोंबिवली: अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोन यांच्या भूमिकेला विरोध म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या कलाकारांची भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपटाला विरोध केला. तसेच रामनगरमधील मधुबन सिनेमागृहावर लावलेला ‘पठाण’ चित्रपटाचा फलक सिनेमागृह मालकाला हटवण्यास भाग पाडले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी चित्रपटगृह मालकाबरोबर चर्चा करून सिनेमागृहावरील ‘पठाण’ चित्रपटाचा फलक काढण्यात आला.