रक्षाबंधनच्या गर्दीचा विचार न करता उपनगरी रेल्वेचे रविवार वेळापत्रक

मुंबई : स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षात न घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार वेळापत्रक लागू करण्याचा अजब निर्णय गुरुवारी घेतला. त्यामुळे उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. गाडय़ा वीस मिनिटे ते अर्धा तास उशिराने धावत असल्याने मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागले.

रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक जण आपल्या मुलांबाळांसह घराबाहेर पडतात आणि नातेवाईकांकडे जातात. या प्रवाशांचा मुख्य भर उपनगरी रेल्वेसेवेवरच असतो. त्यामुळे दर वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वेगाडय़ांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, या गोष्टीचा विचार न करता, मध्य आणि पश्चिम रेल्वेने सुट्टी पाहून गुरुवारी रविवारचे वेळापत्रक लागू केले. त्यामुळे नियमित होणाऱ्या फेऱ्यांमध्ये कपात केली गेली.

मध्य रेल्वेवर दररोज धावणाऱ्या १ हजार ७७४ पैकी १,४३२ फेऱ्याच चालवण्यात आल्या. तर पश्चिम रेल्वेवरही दररोज होणाऱ्या १ हजार ३६७ फेऱ्याही पूर्णपणे होऊ शकल्या नाहीत. परिणामी सेवेत असलेल्या फेऱ्या वीस मिनिटे ते अर्धा तास उशिराने होत होत्या. त्याचा प्रवाशांना आणि खासकरून महिला प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला.

लहान मुलांना सोबत घेऊन डब्यात प्रवेश करताना तर गर्दी, धक्काबुकी यालाच तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये वादही होत होते. काही प्रवाशांना गर्दीमुळे रेल्वे डब्यात प्रवेशही करता येत नव्हता. स्थानकातील इंडिकेटरवर गाडीचे ठिकाण व त्याची वेळही चुकीची दाखवत होते. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे पकडताना त्रेधातिरपिट उडत होती. कुर्ला, घाटकोपर ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूपर्यंत, तर पश्चिम रेल्वेवरीलही दादर, वांद्रे ते बोरिवली, दहिसर, नालासोपारा, भाईंदर, वसई, विरार स्थानकांत गर्दी होती. महत्त्वाची बाब म्हणजे रविवार वेळापत्रक लागू केले जात आहे, याची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी असते. या दिवशी रेल्वेकडून उपनगरीय सेवा रविवार वेळापत्रकानुसार चालवली जात असल्याचे सांगितले. तर मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने २० ते २५ टक्के फेऱ्या कमी धावत असून रविवावर वेळापत्रक लागू केल्याचे मान्य केले.

तिकीट खिडक्यांसमोर रांगा

रक्षाबंधनानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या ही मोठी असते. या दिवशी स्थानकात जास्तीत जास्त तिकीट खिडक्या सुरू ठेवण्याऐवजी त्या कमी सुरू असल्याचे बहुतेक स्थानकांत दिसत होते. त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर भल्या मोठय़ा रांगा होत्या. हीच परिस्थिती एटीव्हीएमसमोरही होती.

Story img Loader