मुंबईः मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात मानवी बॉम्ब असून तिच्याकडे दहशतवाद्यांचे ८० ते ९० लाख रुपये असल्याच्या धमकीचा दूरध्वनी दिल्ली नियंत्रण कक्षाला आला होता. याबाबत तातडीने मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. महिलेला अडकवण्यासाठी हा दूरध्वनी करण्यात आल्याचा संशय आहे. विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईत आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातून गौरी बारवाणी नावाची महिला प्रवास करीत असून ती महिला मुंबईतील वर्सोवा येथे राहते. दिल्लीहून ती परदेशात जाणार असून तिच्याकडे ८० ते ९० लाख रुपये आहेत. तिच्याकडे दहशतवाद्यांचे पैसे असून ती मानवी बॉम्ब आहे. ती परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी लंडनला जात असल्याची माहिती दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिली. याबाबत दिल्ली नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच विमानतळावरील यंत्रणांनी तपासणी केली. महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने हा दूरध्वनी करण्यात आल्याचा संशय आहे.

हेही वाचा >>>आदित्य ठाकरेंचं निवडणूक प्रतिज्ञापत्र: २३ कोटींची मालमत्ता आणि एक दाखल गुन्हा!

गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे संदेश येण्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे आठवड्याभरात मुंबईत १० गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारीही एक्स (ट्वीटर) हँडलद्वारे १० विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी दाखल केलेला हा १० वा गुन्हा आहे. या प्रकरणांमध्ये गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. सहार पोलिसांनी अनोळखी ट्वीटर खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत एक्सद्वारे मंगळवारी धमकी देण्यात आली असून तपासणीत त्यात तथ्य आढळले नाही. गेल्या १० दिवसांत मुंबई पोलिसांनी १० गुन्हे दाखल केले असून या प्रकरणांमध्ये विमानात बॉम्ब असल्याचे संदेश अथवा ई-मेल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून धमक्यांचे सत्र सुरू असून सर्व विमानांमधील प्रवासी आणि सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. आवश्यक तपासणीनंतर या धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.

देशातील विविध विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती रविवारीही मिळाली होती. त्यात यूके १०६ (सिंगापूर – मुंबई) आणि यूके १०७ (मुंबई – सिंगापूर) यासह विस्तारा एअरलाइन्सला त्यांच्या सहा मुंफ्लाइटसाठी धमक्या मिळाल्या होत्या. अकासा एअरला देखील क्यूपी १०२ (अहमदाबाद – मुंबई), क्यूपी १३८५ (मुंबई – बागडोगरा), क्यूपी १५१९ (कोची – मुंबई) आणि क्यूपी १५२६ (लखनऊ – मुंबई) यासह अनेक विमानांबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. इंडिगो एअरलाइन्सच्या ६ ई ५८ (जेद्दा – मुंबई) आणि ६ ई १७ (मुंबई – इस्तंबूल) सह सहा विमानांवर सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. प्रत्येक विमानांची व प्रवशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच उदयपूर – मुंबई विमानामध्ये बॉम्ब असल्याचे टिश्यू पेपरवर लिहिण्यात आले होते. तोही संदेश खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते. सहार पोलिसांनी गेल्या आठवड्यात छत्तीसगडमधून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला पकडले होते. त्याच्यावर एक्स या समाज माध्यमावर एका व्यक्तीच्या नावाने खाते तयार करून धमकीचा संदेश पोस्ट केल्याचा आरोप आहे. जुन्या वादावरून संबंधित व्यक्तीला अडवकण्यासाठी त्याने हा प्रकार केला होता.