मुंबई : सोलापूर येथील बाळू कटके यांना रुग्णाला गंभीर अवस्थेमध्ये शीव रुग्णालयात आणल्यानंतर कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेण्यास विलंब केला. या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने शीव रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह पाच डॉक्टरांना समन्स बजावले आहे. या सर्व डॉक्टरांना ३० एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोलापूरमध्ये मार्च महिन्यात झालेल्या रस्ते अपघातात शेतकरी बाळू कटके (८७) जखमी झाले होते. त्यांना अकलूज येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मुलगा विष्णू कटके याने त्यांना अकलूजमधील रुग्णालयातून रुग्णवाहिकेने शीव रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु गंभीर अवस्थेतील कटके यांच्यावर डॉक्टरांनी त्वरित उपचार करण्यास नकार दिला. तसेच विष्णू कटके यांनी विनंती केल्यानंतर अधिष्ठाता व खासदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण २४ तास स्ट्रेचरवर होता. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन राज्य मानवाधिकार आयोगाने शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, ट्रॉमा सेंटरचे डॉ. परेश, शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. सेठना, डॉ. प्रकाश आणि डॉ. पंकज यांना समन्स बजावले. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या डॉक्टरांनी मानवी हक्क नियमांचे उल्लंघन केले आहे, असे मत मांडत आयोगाने समन्स बजावले. या सर्व डॉक्टरांना ३० एप्रिल रोजी न्यायालय क्रमांक १ मध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच आयोगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना या प्रकरणाचा तपास अहवाल आठ आठवड्यांमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
बाळू कटके यांना मोबाइल व्हॅनद्वारे सहा तासांचा प्रवास करून ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शीव रुग्णालयात आणले. त्यावेळी आपत्कालिन विभागामध्ये कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने त्यांना आतमध्ये घेण्यास नकार दिला. तसेच ट्रॉमा केअर विभागातील डॉक्टरनेही खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही, असा वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगत कटके यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला. त्याचबरोबर रुग्ण ८७ वर्षांचे असून, त्यांच्या वाचण्याची काहीच शाश्वती नाही. तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची ती करा, मला काहीच फरक पडत नसल्याचे त्या डॉक्टरने उद्धटपणे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरनेही हीच भूमिका घेतली. अखेर खासदार व अधिष्ठात्यांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला विलंब झाल्याने बाळू कटके यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला.