मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी आठ जणांना थांबवण्यात आले असून त्यातील तिघे अल्पवयीन असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. सर्व जण लंडन येथील एका विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न करत होते. ते सर्व हरियाणातील हिसार परिसरातील रहिवासी आहेत. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मोठी टोळी असल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी बोर्डिंग पास काऊंटरवर दोन संशयित प्रवाशांना अडवण्यात आले. चौकशी दरम्यान, त्यांनी हरियाणातील एका विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक असल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकांनी पुरावे मागितले असता ते कोणतेही पुरावे देऊ शकले नाहीत. त्यानंतर चौकशी केली असता त्यांच्यासह आणखी सहा जण लंडनला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांची उड्डाणे ते एसव्ही-७७३ व एसव्ही-११९ विमानाने जेद्दाहमार्गे लंडनला जात होते. त्यानंतर याप्रकरणी इतर सहा जणांनाही थांबण्यात आले. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्यावतीने देण्यात आली. त्यानंतर सर्वांना गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले.
…प्रत्येकी २० लाख रुपये
याप्रकरणात बिट्टू नावाच्या दलालाचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्याने आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या परदेशात पाठवण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी त्याने प्रत्येकी २० लाख रुपये स्वीकारले होते. आरोपी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्यांना भेटला. तेथेच त्याने हा संपूर्ण कट रचला. त्याने ओम स्टर्लिंग ग्लोबल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापक असल्याचे भासवले.बनावट कागदपत्राच्या आधारे बिट्टूने इंग्लंड येथील दूतावासातून व्हिजिट व्हिसा मिळवला. त्यासाठी प्रत्येकाकडून २० लाख रुपये घेतले. बिट्टूने विजेंदर सिंग नावाच्या व्यक्तीशी त्यांचा परिचय करून दिला. त्याने सर्वांना दिल्लीतून मुंबईला आणले आणि त्यानंतर लंडनला पाठवण्याचे नियोजन केले. त्यांच्यावर पारपत्र कायद्याच्या कलम १२ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. परदेशात स्थानिक होण्यासाठी जात असलेल्या सात जणांपैकी तिघे अल्पवयीन आहेत. त्यांच्या कुटुंबियांना याबाबतच माहिती देण्यात आले असून त्यांना मुंबईला बोलवण्यात आले आहे.