आनंद किंवा दु:खाची बातमी देण्यासाठी दारात उभा राहणारा ‘तारवाला’ रविवारी अखेर इतिहासजमा झाला. एकेकाळी संदेशवहनाचे सर्वात जलद माध्यम असलेल्या तारसेवेला मुंबईसह देशभरातील असंख्य नागरिकांनी रविवारी शेवटची ‘तार’ पाठवूनच निरोप दिला. १६० वर्षांच्या या सेवेच्या आठवणींची ‘पावती’ सोबत घेऊन परत निघालेल्या साऱ्यांच्याच मनात एका परंपरेची तार तुटल्याची भावना होती.
मुंबई उपनगरातील अन्य तारगृहे रविवारी बंद असतात. त्यामुळे हुतात्मा चौक येथील मुख्य तारगृहात शेवटची तार करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. तारेचे अर्ज हाती घेतलेल्या लोकांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. तारगृहात आणि आवारातही, जागा मिळेल तिथे उभे राहून, बसून असंख्य नागरिक तार लिहिताना दिसत होते.  
या मुख्य कार्यालयात चीफ टेलिग्राफ मास्टर म्हणून काम करणाऱ्या अनघा खांबेटे, हेमलता चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. मोर्स तारयंत्रावर काम करणे हे खूप कठीण होते. केवळ ‘कड कट्ट, कड कट्ट’च्या भाषेत संदेश पाठवले जायचे. आता संगणकावर तारेचे टंकलेखन केले जाते. पण आम्ही काही वर्षे मोर्स यंत्रावर काम केले. या नोकरीने आम्हाला भरभरून दिले, असे सांगताना त्यांचा स्वरही दाटून आला..  
मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे अ‍ॅड. आशीष यांनी रविवारी तारेच्या अखेरच्या दिवसाची आठवण आपल्या सुहृदांनाही राहावी म्हणून रविवारी देशाच्या विविध भागांतील मित्र, नातेवाइकांना २९ तारा पाठवल्या.
नेहमी या मंडळींशी भ्रमणध्वनीवर किंवा लघुसंदेशाच्या माध्यमातून संपर्क व्हायचा, पण आता तार हा प्रकार इतिहासजमा होणार असल्याने सगळ्यांना तार पाठविल्याचे ते म्हणाले. तर शीव येथे राहणारा आणि नुकतेच ‘एलएल.बी.’चे शिक्षण पूर्ण केलेला अमेय मेहता याने आपल्या काका आणि मित्रांना पाठवलेल्या तारेचे शब्द होते.. ‘वन ऑफ द लास्ट टेलिग्राफ.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundreds gather to say farewell to telegraph