मुंबई : गेली पाच वर्षे माझ्या पत्नीला आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मोफत डायलिसीस सेवा मिळते आहे. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला खाजगी रुग्णालयात हा उपचार करणे परवडलेच नसते, असे सखाराम यांनी सांगितले. डायलिसीस सेवेची आवश्यकता असलेल्या राज्यातील शेकडो गोरगरीब रुग्णाना आज आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये ही सेवा मोफत मिळत आहे. सध्या आरोग्य विभागाच्या ६२ जिल्हा तसेच उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयात गेल्या वर्षभरात तब्बल एक लाखाहून अधिकवेळा रुग्णांना डायलिसीस सेवा देण्यात आली आहे. साधारणपणे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना आठवड्यामधून तीनवेळा डायलिसीस करावे लागते व खाजगी रुग्णालयात एकवेळच्या डायलिसीससाठी १२०० ते २००० रुपये खर्च येतो. गरीब तर सोडाच परंतु मध्यमवर्गीयांनाही हा खर्च परवडत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना प्रामुख्याने मुत्रपिंड विकाराचा त्रास होते व मूत्रपिंड योग्य प्रकारे काम करेनासे झाल्यानंतर डायलिसीस हाच एकमेव पर्याय राहातो. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा आणखी एक पर्याय असला तरी त्यासाठी येणारा खर्च तसेच विविध कारणांमुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे.
डायलिसीसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या काळात २०१३ साली सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सेवा सुरु करण्यात आली. काही कालावधीसाठी आरोग्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी या सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणात डायलिसीस सेवा सुरु करण्यात आली. आजघडीला आरोग्य विभागाच्या एकूण ६२ रुग्णालयांमध्ये ३९१ डायलिसीस मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रुग्णांना डायलिसीस सेवा देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मूत्रपिंड जेव्हा रक्तातील नको असलेले घटक बाहेर काढण्यास असक्षम होतात आणि त्यांच्या कार्यावर परिणाम झालेला असतो, तेव्हा रुग्णाला डायलिसीसची आवश्यकता असते. मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा रुग्णालयांसह सामान्य रुग्णालये, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये, स्त्री रुग्णालय नांदेड, उपजिल्हा रुग्णालयांतून एकूण ६२ डायलिसीस केंद्राद्वारे तसेच इतर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत मोफत डायलिसीस सेवा देण्यात येत आहे. डायलिसीस केंद्रांद्वारे २०२३-२४ मध्ये तब्बल १,०३,०८० वेळा रुग्णांना डायलिसीस दिले गेले तर २०२४ ऑक्टोबरपर्यंत ६८,७९९ डायलिसीस करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून डायलिसीसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून या सेवेचा सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये जागेच्या तसेच मनुष्यबळाचा विचार करून विस्तार करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालक रुग्णालये डॉ सुनीता गोलाईत यांनी सांगितले. सध्या आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये दोन पाळ्यांमध्ये डायलिसीस सेवा दिली जाते. आगामी काळात तीन पाळ्यांमध्ये ही सेवा देण्याचाही आमचा विचार असल्याचे डॉ गोलाईत यांनी सांगितले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या डायलिसीसच्या रुग्णांचा विचार करता या सेवेचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन डायलिसीस मशीन असून यंदा एप्रिलपासून आतापर्यंत ७५० वेळा डायलिसीस केल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय पोळ यांनी सांगितले. ग्रामीण भागत ही सेवा नसती तर रुग्णांचे अतोनात हाल झाले असते. आज आमच्याकडे दहा रुग्ण असून २०२१ पासून आतापर्यंत ४,१०० वेळा रुग्णांना डायलिसीस करण्यात आल्याचे डॉ पोळ म्हणाले.
डायलिसीसद्वारे शरीरातून रक्त मशीनद्वारे शुद्ध केले जाते आणि नंतर शुद्ध केलेले रक्त डायलिसिस मशीनच्या मदतीने शरीरात परत सोडले जाते. रक्तातील अशुद्ध घटक, इतर क्षार व अतिरिक्त पाणी हे बाहेर पडतात. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलिसीस ही एक योग्य प्रक्रिया आहे. डायलिसिसमध्ये ‘हेमोडायलिसिस’ व ‘पेरिटोनियल डायलिसिस’ असे दोन प्रकार आहेत. याआधी केवळ जिल्हा रुग्णालयात डायलिसिसची मोफत सेवा होती; आता मात्र जिल्हा रुग्णालयांसह महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत डायलिसीसचा समावेश झाल्याने रुग्णांना आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस करता येते.
हेही वाचा…मुंबई व औरंगाबादमधील ९ ठिकाणी ईडीचे छापे
राज्यातील जिल्हा रुग्णालयांसह सामान्य रुग्णालये, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये, स्त्री रुग्णालय नांदेड, उपजिल्हा रुग्णालयांतून एकूण ६२ डायलिसीस केंद्रामधून ३९१ डायलिसीस मशीनद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही सेवा तालुका स्तरापर्यंत वाढवून सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे ४३२ केंद्रांद्वारे डायलिसीस सेवा पुरविली जाणार आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयातील भिषक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व डायलिसीस तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यात आले असून करार तत्त्वावर सर्व रुग्णालयात नेफ्रॉलॉजीस्ट यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाच्या डायलिसीस केंद्राद्वारे सन २०१७-१८ मध्ये ६६,३८४, सन २०१८-१९ मध्ये ७५,४९२, सन २०१९-२० मध्ये ८१,९६१, २०२०-२१ मध्ये ६७,७७०, २०२१-२२ मध्ये ७१,१५९, २०२२-२३ मध्ये ९३,३८९, तर २०२३-२४ मध्ये १,०३,०८० डायलिसीस करण्यात आले. ग्रामीण भागात मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून याबाबत सविस्तर आढावा घेण्याचे काम आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची व्यापक तपासणी करून या आजाराना अटकाव करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यात वेळीच औषधे घेणे, आहारा व व्यायामाचे महत्त्व सांगण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.