डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येमुळे निर्माण झालेल्या जनक्षोभानंतर राज्य सरकारने ‘जादूटोणाविरोधी कायद्या’चा वटहुकूम काढत आगामी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी त्याचे कायद्यात रूपांतर करू असे, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. हे आश्वासन पाळले न गेल्यास १० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने दिला आहे.
समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या वटहुकमाबाबतच्या राजकीय इच्छाशक्तीला महाराष्ट्राच्या सामाजिक इच्छाशक्तीचे पाठबळ देण्यासाठी ‘अंनिस’तर्फे १४ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर जादूटोणाविरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सर्व जिल्ह्य़ांमधून ‘जादूटोणाविरोधी कायदा मंजुरी निर्धार परिषदे’चे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबईत पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष, संघटना, संस्थांच्या सहभागाने युवा रॅली आणि जाहीर सभेचे आयोजनही करण्यात येणार आहे. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वटहुकमाचे कायद्यात रूपांतर झाले नाही, तर १० डिसेंबरपासून बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा समितीच्या वतीने पाटील यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा