मुंबईः चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने हल्ला करणाऱ्या पतीला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली. वर्सोवा पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी महिलेला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार नंदिनी सोनी (३६) अंधेरी पश्चिम येथील चार बंगला परिसरात वास्तव्यास आहेत.
हेही वाचा >>> मुंबई: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण, दोन महिलांसह पाच जणांना अटक
सोनी रविवारी राहत्या घरी सोफ्यावर आराम करत असताना आरोपी पतीने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच पत्नी आपल्याला विषारी जेवण देत असल्याचा संशयावरून त्याने सोनी यांच्यावर चाकूने हल्ला केला. पतीने सोनी यांच्या डोक्यावर, उजव्या हाताला, दोन्ही पायावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सोनी यांनी कशीतरी आपली सुटका करून घेतली. घटनेनंतर सोनी यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सोनी यांनी घडलेला प्रकार सांगितला. सोनी यांच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पती सुरेशला (५६) सोमवारी अटक केले.