पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्यामुळे आर्थिक अडचणींत आणि मानसिक तणावाखाली असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीने अंधेरीत इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी अंधेरी येथील अंबोली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत चंद्रिकाप्रसाद निर्मल(५०) यांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. ते जोगेश्वरीतील बेहराम बाग येथील रहिवासी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांची पत्नी गीतादेवी यांना गेले काही दिवसांपासून पोटदुखीचा आजार होता. त्यासाठी उपचार सुरू होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पोटात खडा (स्टोन) असल्याचे सांगून शस्त्रक्रियेने तो काढण्याची आवश्यकता असलयाचे सांगितले होते. या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये खर्च येणार होता. पण चंद्रिकाप्रसाद यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नव्हते. आर्थिक अडचणीमुळे ते गेल्याकाही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी ग्राहकांच्या कपड्यांना इस्त्री केले व ते कपडे घेऊन ते निघाले होते. त्यावेळी अंधेरी पश्चिम येथील रेड रोड इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गच्चीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली.
घटनेनंतर त्यांना तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची माहिती तेथील पोलिसांकडून स्थानिक अंबोली पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्यामुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. याबाबत अंबोली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.