मुंबई : येत्या अडीच वर्षांत मध्य वैतरणा धरणक्षेत्रात तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्याुत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकूण २६.५ मेगावॉट (संकरित) वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या संकरित (हायब्रीड) वीजनिर्मिती प्रकल्पामुळे महापालिकेची सुमारे नऊ कोटी रुपयांची वार्षिक बचत करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणावर सौरऊर्जा आणि जलविद्याुत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत आहे. येत्या अडीच वर्षांत या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे.
हे ही वाचा…Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”
या प्रकल्पाच्या ठिकाणी सौरऊर्जा आणि जलविद्याुत निर्मितीसाठी वैतरणा सोलार हायड्रो पॉवर जेनको कंपनीसोबत ऊर्जा खरेदी करार करण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट ४.७५ रुपये या समतुल्य दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमार्फत ही वीज राज्याच्या ग्रीडला जोडून वाहून नेण्यात येईल. तसेच राज्य विद्याुत वीज वितरण कंपनी (महावितरण) सोबत करार करण्यात येईल. वीज खरेदीसाठीचा महावितरणसोबतचा करार आगामी काळात करण्यात येईल. या वीज खरेदी करारामुळे मुंबई पालिकेच्या पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रासाठी लागणारी वीज वापरात सुमारे ९ कोटी रूपयांची बचत होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.