मुंबईः सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत साडेनऊ किलो हायड्रोपोनिक गांजा (कॅनॅबिस) जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे १० कोटी रुपये असून याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रवासी बँकॉकवरून मुंबईत तस्करीच्या उद्देशाने आला होता, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे कवलजीत सिंह (३१) याला ताब्यात घेतले. तो रविवारी विमानाने बँकॉकहून मुंबईत दाखल झाला होता. सिंहच्या हालचालींवरून त्याच्यावर संशय आला. त्यानंतर सिंहला अडवून त्याची झडती घेण्यात आली. पण सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्याकडे काहीही सापडले नाही, मात्र त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये २० पाकिटे सापडली. ती पाकिटे इतर वस्तूंसोबत लपवून ठेवण्यात आली होती. झडतीदरम्यान त्यात हिरवी पाने सापडली. त्यांची तपासणी केली असता बॅगेत गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

सिंहला गांजा तस्करी करीत असल्याचे पूर्णपणे माहीत होती. पैशांसाठी तस्करांच्या टोळीसाठी तो काम करीत होता. सिंहविरोधात दाखल आरोप अत्यंत गंभीर असून त्याला २० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन महिन्यात ७५ कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त

गेल्या दोन महिन्यात मुंबई विमानतळावरून ७५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एकाच कारवाईत पाच प्रवाशांकडून उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला होता. त्यांच्या बॅगेच्या तपासणीदरम्यान ५६ किलो २६० ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपॉनिक गांजाचा सापडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. आरोपीनी हिरव्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा लपवला होता.

पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमधून मोठ्या प्रमाणात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण होते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्ग मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. त्यामुळे बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बँकॉकहून ७५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.