२६/११ हल्ल्यातील आरोपी अबू जुंदालचे घूमजाव

लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यासह विविध प्रकरणातील आरोपी अबू जुंदाल याने महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या कबुली जबाबावरून शुक्रवारी घूमजाव केले. आपण अबू जुंदाल नसून झैबुद्दीन अन्सारी असल्याचा दावा करीत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे आणि दबाव टाकून आपल्याकडून कबुलीजबाब घेतल्याचा आरोप जुंदालने केला आहे.
सध्या तिहार तुरुंगात असलेल्या जुंदालला औरंगाबादेतील शस्त्र व स्फोटके साठय़ाप्रकरणी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. मोडक यांच्यासमोर हजर  करण्यात आले. त्या वेळी त्याने हा आरोप केला.
आपण अबू जुंदाल नसून झैबुद्दीन अन्सारी आहोत आणि कबुली-जबाबात झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल हे आपले लिहिण्यात आलेले नाव चुकीचे असल्याचा दावाही त्याने केला. जुंदालने वकील नियुक्त करण्याचे निर्देश देत नंतरच त्याचे म्हणणे नोंद करून घेतले जाईल, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर जुंदालसाठी अ‍ॅड़  एजाज नक्वी यांनी वकीलपत्र दाखल केले. परंतु न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी १५ डिसेंबपर्यंत तहकूब केली आहे.
दरम्यान, दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या मुस्लीम तरुणांसाठी विनामूल्य कायदेशीर मदत देणाऱ्या ‘जमात-ए-उलेमा’ या स्वयंसेवी संघटनेनेही जुंदालची विनामूल्य वकील देण्याची विनंती फेटाळली आहे.    

Story img Loader