मी हिंदू आहे आणि हिंदुत्वाचा मला अभिमान आहे. हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती आहे आणि आपण सर्वानी ती जपली पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी मंगळवारी दादर येथे केले.
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’या उपक्रमात ते बोलत होते. उपस्थित रसिकांनी पोंक्षे यांच्याशी थेट संवाद साधला. रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाना पोंक्षे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
कलाकाराला एखादी भूमिका अशी मिळायला हवी की ती भूमिका म्हणजे तोच कलाकार, असे समीकरण त्या भूमिकेमुळे तयार होते. ‘नथुराम’च्या रूपात मला ती भूमिका मिळाली, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. याच प्रश्नाच्या ओघात त्यांनी ‘नथुराम’ करताना आलेले काही बरे-वाईट अनुभवही सांगितले.   
लहानपणापासूनच मला अभिनेता व्हायचे होते. अभिनयाचा कोणी एक असा गुरू नसतो, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भक्त असलेल्या पोंक्षे यांनी सावरकरांचे विचार, ‘सावरकरवाद’ काही उदाहरणे देऊन स्पष्ट केला. ‘जे इतिहास विसरतात, त्यांचा भूगोल बिघडतो, असे सावरकर म्हणायचे. ते किती खरे आहे, ते आज आपण पाहतो आहोत, असेही ते म्हणाले.
प्रारंभी ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या मेघना काळे यांनी आगामी रंगसंमेलनाविषयी माहिती दिली.    

Story img Loader