‘धरणात पाणी नसल्यास लघवी करायची का’ किंवा ‘भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते’ अशा बेताल वक्तव्यांबद्दल राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कानउघाडणी करताना सत्तेवर असलेल्यांनी जबाबदारीचे भान बाळगावे, असा सल्लाही दिला. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत अजितदादा नव्हे तर माझेच मत महत्त्वाचे राहील, हेदेखील त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानांनंतर गेले आठवडाभर शरद पवार यांनी मौन बाळगल्याबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषदेत काकाने पुतण्याची चांगलीच कानउघाडणी केली. अजित पवार यांचे वक्तव्य हे अनुचित आणि अयोग्य आहे. त्यांची माझी अद्याप भेट झालेली नाही. पण भेटल्यावर कसे वागावे याचा वडिलकीचा सल्ला नक्कीच देईन, असे पवार यांनी सांगितले. चुकीच्या वक्तव्याबद्दल अजितदादांनी माफी मागितली आहे. एकदा नव्हे तिनदा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. विरोधकांनीही आता या विषयाला पूर्णविराम द्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. वादग्रस्त विधानांवर पक्षाच्या आमदारांशी चर्चा करूनच मग राजीनाम्याचा निर्णय घेईन, असे अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यावर पक्षात आमदारांशी चर्चा करून राजीनाम्याचा निर्णय होत नसतो. आमदारांशी विचारविनिमय करण्यापर्यंत ठीक आहे. पक्षाचा कारभार चालविण्यासाठी उच्च समिती असते. कोणताही धोरणात्मक निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जातो, असे ठामपणे बजावून शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा कारभार हा अजितदादांच्या कलाने चालणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांच्याबाबत निर्णय पक्ष घेईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.  सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांनी राजीनामा दिल्यावरही पक्षात सारे निर्णय मी घेतो, असे शरद पवार यांनी सांगितले होते. पन्नाशीत आल्यावर नेत्यांचा फक्त आशीर्वाद घ्यायचा असतो, निर्णय आपणच घ्यायचे असतात, असे मागे अजित पवार म्हणाले होते. पण पक्षात अजितदादांना मुक्त वाव नाही हेच पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
पातळी आणि पातळ.. तेव्हा आम्ही गप्प बसलो
गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात काही वैयक्तिक आरोप झाल्यावर सभागृह बंद पाडण्यात आले होते. दोन दिवस तसे झाल्यावर सभागृह चालू द्यावे, असा निरोप आपण दिला होता याची आठवण पवार यांनी विरोधकांना (की मुंडे यांना?) करून दिली. अजितदादांच्या विधानाचे समर्थन करताच येणार नाही. पण त्याच वेळी मागे एका मुख्यमंत्र्याने आर. आर. पाटील यांना उद्देशून आम्ही पातळी आणि पातळ सोडत नाही हे विधान केले होते तेव्हा एवढा गोंधळ झाला नव्हता याकडे पवार यांनी लक्ष वेधले. हे विधान मनोहर जोशी यांनी केले होते, असे तत्कालीन विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड यांनी सांगितले.

Story img Loader