‘कौन बनेगा करोडपती’ या ‘ज्ञानकुंभ’ कार्यक्रमाचे चाहते असाल, तर येत्या मे महिन्यापासून ‘ई टीव्ही’वर ‘मी सचिन खेडेकर बोलतोय, कोण होणार मराठी करोडपतीमधून..’ हे वाक्य ऐकण्यासाठी तयार राहा! कारण ‘कोण होणार मराठी करोडपती?’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार, याबाबतची उत्कंठा आता संपली आहे. आपल्या अभिनय सामर्थ्यांने अनेक भूमिका अविस्मरणीय करणाऱ्या सचिन खेडेकर यांच्या खांद्यावर ‘मराठी केबीसी’ची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सचिन तब्बल एका तपानंतर छोटय़ा पडद्यावर दिसणार असून सूत्रसंचालनाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे.
बिग सिनर्जी या कंपनीने ‘कौन बनेगा करोडपती’चे हक्क स्वत:कडे घेतल्यानंतर प्रादेशिक भाषांमधूनही हा कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच परिपाक म्हणून मे महिन्यापासून हा कार्यक्रम ‘ई टीव्ही मराठी’वर ‘कोण होणार मराठी करोडपती’ या नावाने सुरू होणार आहे. हिंदीत अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मराठीत त्यांची भूमिका बजावताना नक्कीच दडपण जाणवणार असल्याचे सचिन खेडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात असलेल्या सचिन खेडेकर यांचा सूत्रसंचालनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याआधी जवळजवळ दरवर्षीच आपल्याला सूत्रसंचालनासाठी विचारणा होत होती. कधी इच्छा झाली नाही म्हणून, तर कधी कार्यक्रम न आवडल्याने आपण नकार देत आलो. मात्र ‘कोण होणार मराठी करोडपती’साठी विचारणा झाल्यावर ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. हा काही नशिबाचा खेळ नाही, तर या कार्यक्रमात तुमचे ज्ञान पणाला लागते. तसेच अमितजींनी अजरामर केलेल्या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधीही सोडायची नव्हती, असे खेडेकर यांनी स्पष्ट केले. गेली अनेक वर्षे वाटय़ाला आलेल्या भूमिकांमधूनही आपण खूप काही शिकलो असून त्याचा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकाच कार्यक्रमात २०० विविध लोकांना भेटायला मिळणे, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे, याची जास्त उत्सुकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांनी ही जबाबदारी पेलण्याआधी तब्बल तीन महिने सराव केला होता. या कार्यक्रमाची ओळख आपल्याला होते ती त्यांच्यासहच! त्यांच्या तुलनेत दहा टक्के यश मिळाले, तरी ते १०० टक्क्यांएवढे आहे. सचिन खेडेकर

Story img Loader