शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अत्यंत अपमानित अवस्थेत व्यासपीठ सोडायला लागल्यानंतर चार दिवस अज्ञातवासात गेलेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही,’ या थाटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्र लिहिले. हे पत्र खासगी असल्याचे सरांनी म्हटले असले तरी त्यात ‘मी कोणतीही चूक केली नाही’ असे त्यांनी उद्धव यांना सांगितल्याचे समजते.
मनोहर जोशी यांनी उद्धव यांना पत्र लिहून माफी मागितल्याचे वृत्त सेनेच्या गोटातून पेरण्यात आले होते. खंडाळ्याहून परतलेले मनोहर जोशी यांनी, ‘आपण उद्धव यांना पत्र लिहिले होते. मात्र ते खासगी असल्यामुळे त्याचा तपशील देता येणार नाही’, असे सांगितले. त्याचवेळी या पत्रात दसरा मेळाव्यापूर्वी झालेल्या घटनाक्रमाचे केवळ सत्य आपण सांगितले असून मी कोणतीही चूक केलेली नसल्याचे म्हटले आहे. ‘मातोश्री’ हे माझ्याकरता मंदिर असून मला बोलावले तर तेथे जाणारच; परंतु नाही बोलावले तरीही जाणार, असेही ते म्हणाले.
सेनेचे ‘चाणक्य’ अस्वस्थ
मनोहर जोशी यांच्या पत्रप्रपंचामुळे तसेच शनिवारपासून कार्यरत होण्याच्या भूमिकेमुळे सेनेच्या ‘चाणक्यां’मध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. दसरा मेळाव्यातील अपमान नाटय़ानंतर जोशी संतापून राजीनामा देतील अशी अटकळ होती. मात्र ती खोटी ठरल्याने सरांचे आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आता उद्धव ठाकरे या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
शाखेत बसणार
दसरा मेळाव्यामध्ये जे काही झाले त्यामुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही, असे स्पष्ट करताना दादर येथील आपल्या कार्यालयात नेहमीप्रमाणे जाऊन शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करणार असल्याचेही जोशी म्हणाले. पक्षाने अन्यत्र लढण्यास सांगितले तर निवडणूक लढविण्याची आपली आजही इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.