धर्माबद्दल संकुचित विचार करणारे काही लोक माझ्या भारतीय मुसलमान अभिनेता असण्याचा संदर्भ क्षुल्लक फायद्यासाठी जोडून घेतात. असा गैरफायदा घेणाऱ्या लोकांना माझी भूमिका स्पष्ट व्हावी, असा माझा तो लेख लिहिण्यामागे उद्देश होता. पण, याबाबतीतही लेखाचा उलटाच परिणाम झाला, असे म्हणत शाहरुखने आपल्या लेखावरून झालेला वाद निर्थक असल्याचे म्हटले आहे.
मी भारतात असुरक्षित आहे, असे लेखात कुठेही म्हटलेले नाही. माझा लेख आधी वाचा आणि मग मी खरोखरच त्यात असे म्हटले आहे का, हे तुम्हीच मला सांगा, असे उलट आवाहनही त्याने केले. मला आणि माझ्या देशाला फुकट सल्ले देणाऱ्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की, आम्ही भारतात सुरक्षित आहोत आणि आनंदीही आहोत, असा शब्दांत त्याने या संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
‘खान’ आडनावामुळे आपल्याला देश-परदेशात किती त्रास सहन करावा लागतो, हे सांगण्याची एकही संधी न सोडणारा शाहरूख या ‘बीइंग खान’ नाम्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
 एका साप्ताहिकासाठी लिहिलेल्या लेखात शाहरुखने ‘भारतातील मुस्लिमांसंदर्भात जे काही चुकीचे असेल त्याबद्दल टीकाटिप्पणी करताना राजकीय नेत्यांकडून विनाकारण मी त्या समाजाचा एकमेव प्रतिनिधी असल्यासारखे माझ्यावर तोंडसुख घेतले जाते’, असे विधान केले आहे.
 या विधानावरून पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी भारताने शाहरुखला सुरक्षा दिली पाहिजे, असे सांगत शहाजोगपणा केला. त्याला भारताच्या केंद्रीय गृहसचिवांनी खरमरीत उत्तर दिले असले तरी या मुलाखतीवरून सुरू झालेल्या वादामुळे शाहरुख पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. या पाश्र्वभूमीवर त्याने मंगळवारी प्रसिध्दीमाध्यमांकडे खुलासा केला.
पंधरवडय़ापूर्वी शाहरुखची सुरक्षाव्यवस्था पोलिसांनी काढून घेतल्याचे सांगितले जात होते. त्यातच उपरोक्त लेखात त्याने खान म्हणून आपल्याला मिळत असलेल्या वाईट वागणुकीबद्दल दु:ख व्यक्त केले. माझे वडील भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. तरीही माझ्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचे आरोप वेळोवेळी केले गेले. मी माझे येथील घर सोडून पाकिस्तानमध्ये जावे, या मागणीसाठी राजकीय नेत्यांनी मोर्चेही काढले,’ असे लेखात म्हणणाऱ्या शाहरुखने आपण भारतीय असल्याचे दाखलेही दिले
आहेत.
पत्रकारांनीही यापुढे मला माझ्या चित्रपटांविषयीच प्रश्न विचारावेत. अन्य मुद्यांवर मला छेडू नये, असे आवाहनही शाहरुखने केले आहे.