मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी इशारा दिल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. शिवाय, यानंतर राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका देखील घेतल्याचे दिसून आले होते. अखेर राणा दाम्पत्यास १४ दिवसांची न्यायायलयीन कोठडी सुनावली गेली आणि त्यांची कारागृहात रवानगी झाली. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.

आज ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी, तुम्हा आता भ्रष्टाचाराच्या मुद्य्याचा उल्लेख केला, ते करणारे किंवा छोटे-मोठे प्रश्न घेऊन तुमच्या घरासमोर काहीतरी स्त्रोत्र पठण करू इच्छिणारे वैगेरे असे मध्यंतरी आरोप करणारे. या सगळ्यांना हातळण्यात शिवसेना कमी पडते, सरकार कमी पडतं किंवा त्यांचा जो एक सापळा रचला जातो विषयांचा, त्यामध्ये अडकता असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला.

…मग भोंगाबंदी देशभर करा ना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “त्यांना हाताळण्यात नाही, मला काळजी आहे त्यांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे. त्यांच्यापासून त्यांना वाचवण्यात मी कमी पडतो की काय? अशी मला भीती वाटते. कारण, अशा लोकांना हाताळणारे खूप आहेत, लाखो-करोडो हात आहेत. त्यामुळे हाताळण्याची मला काही चिंता नाही, उलट वाचवण्याची चिंता पडते. ”

हे तमाशे कशासाठी पाहिजेत? –

तसेच, “हेच तर मला म्हणायचं आहे की, हे तमाशे कशासाठी पाहिजेत? अचानक असं काय झालं आहे की तुम्हाला, एकदम हनुमान चालीसा आठवली? असं नेमकं तुम्हाला काय वाटलं की हे केलं पाहिजे? हेच तर माझं मत आहे की प्रत्येकजण आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. कारण, आपल्या समोर संकटं कमी नाहीत, ते येतातच आहेत. ” असंही यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलून दाखवलं.

या पातळीव राज्यातील राजकारण कधीच गेलं नव्हतं –

याचबरोबर, “आम्ही कुठेही फरफटत गेलो नाही, उलट भाजपाला समजत नाही की आता करायचं काय? कारण, शिवसेना त्यांच्यासोबत जाणार होती. त्यावेळी तर राष्ट्रवादी दोन दिवसांत जाणार होती. काँग्रेसचे आमदार फुटणार होते, अडीच वर्ष झाली काहीच होत नाही. ईडी वैगरे सगळं झालं. आता तर लोकांच्या मनात तीव्र संताप उफाळून यायला लागला आहे. जी तुमचं थेरं चाललेली आहेत, की यावर धाड, त्यावर धाड. माझ्या झोपडपट्टीतील कार्यकर्त्यावर धाड. त्यावरून लोकांचे पोट कुठे भरतय? असं राजकारण आपल्या लोकांनी कधी बघितलेलं नाही. खोटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजायची पण जनतेच्या पोळीचं काय? या पातळीव राज्यातील राजकारण कधीच गेलं नव्हतं, देशातलंही गेलं नव्हतं. ” असं म्हणत यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा देखील साधला.

Story img Loader