झकी-उर रहमानकडून माहिती मिळाल्याचा दावा;बीएआरसीला भेट ; उपराष्ट्रपती निवासाचे चित्रीकरण
गुजरात येथे कथित पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँबद्दल मला माहिती नव्हती. इशरतची माहिती मला झकी-उर रहमानकडून मिळाली, तर चकमकीबाबत प्रसिद्धीमाध्यमांकडून कळल्याचा दावा २६/११च्या हल्ल्याशी संबंधित खटल्यातील माफीचा साक्षीदार लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने शनिवारी विशेष न्यायालयासमोर करत संभ्रम निर्माण केला. एवढेच नव्हे, तर याबाबत आपण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सांगितले होते. मात्र त्यानंतरही जबाबात त्याचा समावेश का केला नाही हे माहीत नसल्याचे सांगत हेडलीने ‘एनआयए’च्या तपासावरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खटल्यातील मुख्य आरोपी अबू जुंदाल याचे वकील वहाब खान यांच्याकडून गेले चार दिवस हेडलीची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उलटतपासणी सुरू होती. शनिवारच्या सुनावणीत खान यांनी हेडलीला त्याने ‘एनआयए’च्या चौकशीत दिलेला जबाब आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांच्या आधारे उलटतपासणी घेऊन त्यातील तफावत उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यातही इशरत प्रकरणाबाबत खान यांनी ही उलटतपासणी घेतली. त्या वेळी सुरुवातीलाच ‘एनआयए’ने चौकशीदरम्यान नोंदवलेला जबाब आपल्याला वाचून दाखवण्यात आला नव्हता. तसेच आज पहिल्यांदा उलटतपासणीच्या वेळी तो पाहत असल्याचा खुलासा हेडलीने केला. शिवाय इशरत जहाँ प्रकरणासह आपण अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत त्या ‘एनआयए’ने जबाबात का लिहिल्या व ज्या सांगितल्या त्या का लिहिल्या नाहीत, हे माहीत नसल्याचा दावा केला.
इशरत प्रकरणाबाबत आपल्याला झकी-उर रहमान- मुझम्मिल बट या दोघांकडून तसेच हल्ल्याचा प्रयत्न फसल्याचे व इशरत ठार झाल्याचे वृत्तपत्रांतून कळल्याचे हेडलीने न्यायालयाला सांगितले.
झकी-उर रहमानने लष्करच्या ज्या गटात आपण समाविष्ट होतो त्याचा प्रमुख असलेल्या मुझम्मिलशी भेट घालून दिली होती. त्या वेळी मुझम्मिलनेच अक्षरधाम आणि इशरत जहाँसारख्या अयशस्वी हल्ल्याचे प्रयत्न केल्याचे टोमण्याद्वारे सांगितले होते. परंतु हे दोन्ही हल्ले अयशस्वी का ठरले याचा अंदाज मी प्रसिद्धीमाध्यमांतील वृत्तांद्वारे लावला होता आणि त्याबाबत ‘एनआयए’ला सांगितले नव्हते. त्यानंतरही जबाबात ते का लिहिले आहे हे माहीत नसल्याचा दावा हेडलीने केला. इशरतला गुजरातच्या नाका परिसरात मारल्याचे मुझम्मिलने मला नंतर सांगितल्याचे, भारतीय नागरिक परंतु लष्करसाठी काम करणारी इशरतच होती, शिवाय मुझम्मिलने गुजरात-महाराष्ट्रात हल्ल्याचे कट रचल्याचेही ‘एनआयए’ला सांगूनही ते जबाबात नसल्याबाबत हेडलीने ‘का ते मला माहीत नाही’, असे उत्तर दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा