नागपूरमधील आपल्या मतदारसंघातील झोपडपट्टीबाबतचे प्रश्न वारंवार पाठपुरावा करूनही सुटत नसल्याने नाराज असल्याचे वृत्त निराधार असून, आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे रोजगार हमी योजना आणि जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी मुंबईत स्पष्ट केले. नागपुरातील वसाहतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी वाद झाल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले.
मतदारसंघातील झोपडपट्टीच्या प्रश्नावर राऊत आक्रमक असून ते सोडवण्यासाठी सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने ते नाराज झाले असून, सोमवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना रविवारी सायंकाळी राऊत यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेत मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला, असे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलून त्यांना राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.
मध्यंतरी जलसंधारण खात्याच्या कारभाराबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून राऊत यांचे बिनसले होते, असे समजते.

Story img Loader