लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होती. आता निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली आहे. या निवडणुकीच्या आधी अनेकांनी आपला पक्ष सोडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात जाणं पसंत केलं. मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता लोकसभा निवडणुकीचे टप्पे संपल्यानंतर उद्धव ठाकरेंमुळे मी पक्ष सोडला असं मिलिंद देवरांनी म्हटलं आहे.
मी समाधानी आहे
माझ्या मनात कुठेही घालमेल नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला संधी दिली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं त्यामुळे मी फार आनंदी आहे, समाधानी आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव या फायटर आहेत. त्या नक्कीच निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही असंही मिलिंद देवरांनी म्हटलं आहे.
एक प्रकारची विचित्र अवस्था
या वेळी एक प्रकारची विचित्र अवस्था होती. मागच्या ४५ वर्षांमध्ये देवरा कुटुंबाचं नाव बॅलेट पेपरवर होतं. मला अभिमान आहे की यावेळी मी फॅमिली मेंबरसाठी नाही तर शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मतदान केलं. महायुतीकडे पाच पांडव आहेत, पाच पांडवांनी या ठिकाणी उत्तम काम केलं आहे. मी स्वतःही एक पांडव आहे त्या पाचजणांपैकी एक. सध्याच्या घडीला मुंबईत प्रश्न आहेत, ते सोडवणं महत्त्वाचं आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना नाव देण्यासाठी काम करायचं आहे. असंही देवरांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
उद्धव ठाकरेंमुळे मी पक्ष सोडला-देवरा
काँग्रेस आता माझ्यासाठी भूतकाळ आहे. मला आता भविष्याकडे बघायचं आहे. दक्षिण मुंबई हा मला सगळ्यात उत्तम मतदारसंघ वाटतो. मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला हे स्पष्ट सांगितलं होतं की आपण ही जागा गमवायला नको. मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर खूप दबाव टाकला. त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं असं मिलिंद देवरांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी काँग्रेसला शुभेच्छाही दिल्या आहेत.
अरविंद सावंत निवडून येणार नाहीत
“ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. २०१४, २०१९ नंतर त्यांनी काही कामे केली नाहीत. ते मोदी लाटेत निवडून आले. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. त्या भागात कधी फिरत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते कुठलंही काम करत नाहीत. त्यांनी नागरिकांसाठी कोणतीही बैठक बोलावली नाही. त्यांनी ना बीएमसीसोबत ना म्हाडासोबत बैठक बोलावली नाही. त्यांनी गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यासोबत नागरिकांच्या घरांच्या समस्येवर बैठक आयोजित केली नाही. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं नाही. मग जनतेला न्याय मिळणार कसा?” असा प्रश्न मिलिंद देवरा यांनी विचारला.