गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून झालेल्या पोलीस पथकावरील हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांनासोबत आम्ही आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नक्षलवाद्यांचा धोका संपवण्यासाठी यापुढे अधिक तीव्रतेने प्रयत्न केले जातील तसेच त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा शब्दांत त्यांनी हिंसाचार घडवणाऱ्यांना इशारा दिला आहे.


या भुसुरुंगाच्या स्फोटात सी-६० पथकाचे १६ जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. या शहीदांच्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. या घटनेच्या प्रत्यक्ष क्षणाची माहिती घेण्यासाठी मी राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी देखील याप्रकरणी आपले बोलणे झाले असून या घटनेची परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्यात आल्याचेही त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले.

गडचिरोलीतील दादापूर येथे बुधवारी (१ मे) सकाळी तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी मंगळवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १६ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.