डॉ. हरी नरके यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. एक लेखक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून ते देशाला परिचित होते. आज सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या एशियन हार्ट इन्स्टिट्युट या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रा. हरी नरके यांच्या आयुष्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा प्रचंड प्रभाव होता. तसंच त्यांनी या विषयावर अनेक लेख, पुस्तकं लिहिली. व्याख्यानंही दिली. महात्मा फुले यांचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर कसा पडला हे हरी नरके यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरात लावला म्हणून मार खाल्ला होता ती आठवणही त्यांनी सांगितली होती.
कसं होतं हरी नरके यांचं बालपण?
“मी पुण्यातल्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकत होतो. त्यावेळी माझ्या आजूबाजूला राष्ट्र सेवादल, दुसऱ्या बाजूला बाबा आढाव यांचं हमाल पंचायतीचं काम तर तिसऱ्या बाजूला दलित पँथरचं वातावरण होतं. मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेच्या बाजूला भटक्या विमुक्तांचा एक सेटलमेंट कँप होता. सेटलमेंट कँप म्हणजे ज्यांना गु्न्हेगार मानलं गेलं अशा लोकांना एकत्र करुन ब्रिटिश सरकारने तिथे ठेवलं होतं. त्यामुळे जवळ जवळ त्यातली सत्तर ते ऐंशी टक्के मुलं गु्न्हेगारांशी संबंधित होती. अशा वातावरणात मी शाळेत शिकत होतो. त्यावेळी सेवादलाच्या माध्यमातून, बाबा आढाव आणि दलित पँथर यांच्या माध्यमातून माझ्यावर एक संमिश्र संस्कार होत होता. ”
हे पण वाचा- “ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले..”, हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांचं ट्वीट
नामांताराचं आंदोलन त्याच काळात उभं राहिलं
पुढे नामांतरांचं आंदोलन उभं राहिलं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव औरंगबादच्या मराठवाडा विद्यापीठाला दिलं जावं अशी मागणी पुढे आली. आम्ही कुणीही सुरुवातीला त्या आंदोलनात नव्हतो. पण या नामांतराला विरोध करण्यासाठी जे हिंसक आंदोलन झालं, घरंदारं जाळली गेली, माणसं मारली गेली ते भयंकर होतं. या कृतीचा निषेध करण्यासाठी आपण उतरलं पाहिजे हे मला वाटलं. हे वाटण्यामागचं कारण मी ज्या झोपडपट्टीत राहात होतो तेच आहे. त्या झोपडपट्टीत शिकण्याची परंपरा नाही. मी पहिला घरातला शिकणारा कसा झालो? तर माझ्या आईची मानलेली बहीण होती शांताबाई कांबळे. आम्ही तिला शांतामावशी म्हणायचो. ती सतत माझ्या आईला सांगायची की पोराला शाळेत प्रवेश घे. माझी आई दुर्लक्ष करत होती. मात्र एक दिवस आई वैतागली, तिने माझ्या भावाला सांगितलं की त्या शांताबाईचा एक नातेवाईक आहे कुणीतरी बाबासाहेब आंबेडकर, तो सारखं सांगतो पोरांना शाळेत घाला. त्यामुळे त्या शांताबाईने डोकं खाल्लं आहे उद्या हरीला घेऊन शाळेत जा. दुसऱ्या दिवशी माझा मोठा भाऊ आणि मी शाळेत गेलो आणि मुख्यध्यापकांना भेटलो. मुख्याध्यापक आम्हाला म्हणाले वर्ष संपलं आणि तुम्ही शाळेत कसं आणता? तर भाऊ म्हणाला आम्ही म्हणूनच याला शाळेत घालत नव्हतो. काल पाडवा झाला आमचं वर्ष सुरु झालं आणि तुम्ही म्हणताय वर्ष संपलं? शिकला तो हुकला असंच आहे हे. मोठ्या भावाच्या वाक्यानंतर त्या सरांनी आम्हाला थांबवलं, कागद घेतला, अर्ज लिहिला. माझ्या मोठ्या भावाचा अंगठा त्यावर घेतला आणि सांगितलं १ जूनला याला घेऊन ये. ज्यानंतर मी शिकू लागलो.
हे पण वाचा- महात्मा फुले-सावित्रीबाईंचा विचार सांगणारे हरी नरके काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन
बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला म्हणून मार खाल्ला
समजू लागलं तसं माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रेरणा निर्माण केली नसती तर मी शिकूच शकलो नसतो. माझ्या आईला शांता मावशींनी प्रेरित केलं त्यामुळे मी शाळेत जाऊ शकलो. आमच्या कांबळे सरांच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. तो मला खूप आवडला. मी सरांकडो तो फोटो मागितला आणि माझ्या घरात लावला आणि आमच्या घरात प्रचंड भूकंप झाला. कारण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आमच्या घरात लावला म्हणून मला मामाने मला रक्त येईपर्यंत मारलं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला आईने शाळेत घातलं त्यांचा फोटो आपल्या घरात चालत नाही हे मला माहित नव्हतं. ही आठवणही हरी नरकेंनी सांगितली.
महात्मा फुले आयुष्यात कसे आले?
या सगळ्या पार्श्वभूमीवर मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे नामांतराला पाठिंबा देण्यासाठी गेलं पाहिजे हा विचार माझ्या मनात आला. मी मुंबईच्या परिषदेला आलो. त्या परिषेदत मोर्चा काढायचं ठरलं. आम्ही मोर्चात सहभागी झालो आणि आम्हाला सगळ्यांनाच अटक झाली. माझ्यासह ज्यांना अटक करण्यात आली त्यात बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, रावसाहेब कसबे, अनिल अवचट असे महाराष्ट्रातले विचारवंत, लेखक कार्यकर्ते होते. २२ दिवस मी ठाण्याच्या तुरुंगात त्यांच्यासह राहिलो. त्यावेळी महात्मा फुले हे चळवळीतून ऐकत होतो. त्यांच्याविषयी वाचत होतो. एम. फील. करताना महात्मा फुले हाच विषय निवडला. ‘सोबत’ नावाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं साप्ताहिक होते. त्यात बाळ गांगल यांनी अत्यंत गलिच्छ आणि प्रक्षोभक लेख महात्मा फुलेंवर लिहिले होते. जे वाचून मी अस्वस्थ झालो. ते लेख खोटे आहेत हे सांगणारा एक लेख मी लिहिला. त्यानंतर मला पु. ल. देशपांडे यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं तू जे लेख लिहितोतस त्यांचं पुस्तक कर त्यातून पहिलं पुस्तक जन्माला आलं. अशा प्रकारे विविध घटनांमुळे मी महात्मा फुलेंकडे वळलो असं हरी नरके यांनी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं. तसंच संशोधनात एक बाब माझ्या लक्षात आली बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार मेजर रामजी सकपाळ यांना हे मिलिट्रीत होते. ब्रिटिश सरकारने त्यांना शिक्षक करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी पुण्याला पाठवलं. त्यावेळी शिकवायचं कसं? हे त्यांना शिकवायला महात्मा फुले होते. दर रविवारी ते सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुलेंना भेटायला जात असत. काही दिवसांपूर्वी इनसाईडर या युट्यूब चॅनलसाठी हरी नरके यांची मुलाखत राजू परुळेकर यांनी घेतली होती.त्या मुलाखतीत हे भाष्य हरी नरकेंनी केलं होतं.