काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली. ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले. परंतु, यावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी तर महापालिकेतील अधिकाऱ्यांना सज्जड दमच भरला आहे. आज ते सांताक्रूझ येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यात बोलत होते.

“बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि विचार घेऊन आम्ही चाललो आहोत, असं शिंदे सरकार सांगतात. पण ज्या बाळासाहेबांची प्रतिमा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा शाखेत आहे, त्या शाखेला अधिकाऱ्यांनी हात लावला आहे. आता बघायचं आहे की हे शिंदे सरकार काय करावाई करतंय. जर शिंदे सरकार काही कारवाई करणार नसेल तर त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं”, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

हेही वाचा >> मुंबई : विद्याविहार दुर्घटनेतील माय-लेकरांचा अखेर मृत्यू

“कोणीही उठतो आणि शाखेविषयी तक्रार करतो. आणि महानगरपालिकेचे लोकं येऊन कारवाई करतात. उद्यापासून त्यांची कॉलर पकडून वांद्रे विभागात त्यांना फिरवतो आणि कुठकुठे अनधिकृत बांधकामे झाली आहेत ते दाखवतो”, असा इशाराही परबांनी दिला. तसंच, “पोलिसांच्या ताकदीवर आमच्याशी लढू नका. पोलिसांशी आमचं भांडण नाही. पण पोलिसांनीही निष्पक्षपणे काम केलं पाहिजे. मी अजूनही आमदार आहे हे लक्षात ठेवा”, असंही अनिल परब म्हणाले.

हेही वाचा >> मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

आजपासून आंदोलनाला सुरुवात

सांताक्रूझ येथे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या विरोधात ठाकरे गटाने मुंबई पालिकेच्या एच पूर्व विभागात आज मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व अनिल परब यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. “जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा नेऊ”, असंही अनिल परब म्हणाले. “गटारं साफ नाही झाली, कचरा उचलला नाही तर लोकांना त्रासाला सामोरे जावं लागेल. त्यामुळे आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली असं मी जाहीर करतो”, असंही अनिल परब म्हणाले.

Story img Loader