मुंबईत ट्रेनने विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यानंतर टीसींना निरनिराळी कारणे सांगणाऱ्या अनेक महाभागांच्या कथा आजवर आपण ऐकल्या असतील. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवर एका टीसीला असाच भन्नाट अनुभव आला. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी रेल्वेस्थानकात रविवारी प्रेमलता भंसाली या महिलेला विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. यावेळी टीसीने त्यांच्याकडे दंडांची रक्कम भरण्याची मागणी केली. मात्र, या महिलेने पहिले विजय मल्ल्याकडून ९ हजार कोटी वसूल करा, मगच मी २६० रूपये भरेन, असा अजब पवित्रा घेतला. ही महिला रेल्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी तब्बल १० तास वाद घालत होती. टीसी, स्टेशनमास्तर, आरपीएफ अधिकारी यांनी अनेकप्रकारे महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिला स्वत:चा हट्ट सोडण्यास तयार नव्हती. अखेर न्यायालयात हजर राहण्याच्या अटीवर पोलिसांनी तिला सोडून दिले. मात्र, न्यायालयात आल्यानंतरदेखील तिने स्वत:चा हट्ट कायम ठेवला. त्यामुळे न्यायालयाने प्रेमलता भंसाली यांना सात दिवसांची शिक्षा सुनावली. सध्या त्यांची रवानगी भायखळ्यातील महिला जेलमध्ये करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा