विधानभवनाच्या आवारात मंगळवारी जे काही घडले, त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, ते माझ्यावर करावेत, असा खुलासा नालासोपाऱयाचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकरणात दोषी आढळलो, तर राजीनामा देईन, असेही त्यांनी सांगितले.
सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या प्रकाराचे मी समर्थन करीत नाही. आम्ही त्यांना मारहाण केलेली नाही. मात्र, जो अधिकारी आमदाराशी बेशिस्तपणे वागत असेल, तो सर्वसामान्याशी कसा वागत असेल, याची दखल पोलिस खात्याने घेतली पाहिजे. माझी लढाई पोलिस खात्याबरोबर नसून, गैरवर्तणूक करणाऱया सचिन सूर्यवंशी यांच्याबरोबर आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. सूर्यवंशी यांना पोलिस खात्याने पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.
मंगळवारी दुपारी सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब झाल्यावर आम्ही बाहेर पडत असताना सूर्यवंशी यांनी आमच्याकडे बघत हातवारे केले. त्यानंतर सूर्यवंशी यांनी धक्का दिल्यामुळे मनसेचे आमदार राम कदम पडले. हे घडल्यावर सूर्यवंशी यांनी तिथून पळून जाऊ लागले. त्यानंतर चिडलेल्या आमदारांनी सूर्यवंशी यांना पकडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्याला मारहाण झाल्याचा खोटा आरोप केला, असे ठाकूर यांनी सांगितले. सूर्यवंशी विधानभवनामध्ये आले त्यावेळी ते ड्युटीवर नव्हते. ते साध्या वेषात आले होते, असेही ठाकूर यांनी सांगितले.
वांद्रे-वरळी सेतूमार्गावर माझ्या गाडीचा वेग जास्त असल्यामुळे तिला सोमवारी थांबविण्यात आले. मी चालकाला संबंधित दंड भरून त्याची पावती घेण्यास सांगितले. मला पावती मिळाल्यावर त्यावर दोन कलमांखाली दंड वसूल करण्यात आल्याचे मला दिसले. कोणत्या दोन कलमांखाली माझ्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे, हे मी सूर्यवंशी यांना विचारले. मात्र, त्यांनी उद्धटपणे उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्यावर शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करण्यास सुरुवात केली. या सगळ्याचे मोबाईलमधून केलेले चित्रीकरण माझ्याकडे उपलब्ध आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

Story img Loader