देशातील न्यायव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल मला पूर्ण आदर आहे. न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या आत मी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पोलिसांपुढे हजर होईन, या शब्दांत अभिनेता संजय दत्त याने गुरुवारी आपल्या मनातील भावना पत्रकारांपुढे व्यक्त केली. अतिशय भावूक झालेल्या संजय दत्त याला पत्रकार परिषदेवेळी आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्त याही त्याच्यासोबत यावेळी उपस्थित होत्या. प्रिया दत्तही यावेळी खूप भावूक झाल्या. प्रिया दत्त यांनी पत्रकार परिषदेवेळी सातत्याने आपल्या भावाला धीर देण्याचा प्रयत्न केला.
माझे कुटूंब सध्या खूप कठीण परिस्थितीतून जातंय. अशावेळी ज्यांनी मला धीर दिला, त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे सांगून संजय दत्त म्हणाला, माझ्यापुढे आत्ता खूप काम आहे आणि ते सर्व मला शिक्षा भोगण्याच्या आत पूर्ण करायचे आहे. मी शिक्षामाफीसाठी अर्ज करणार नसून, माझ्या शिक्षेवरून माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, अशीही विनंती त्याने केलीये.

Story img Loader