लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित चौदाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत सुळे बोलत होत्या. ‘नवीन शैक्षणिक धोरण : भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण’ या विषयावर रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आणखी वाचा-मुंबई : बनावट झोपडीधारकांवर अंकुश, प्राधिकरणाकडून नवी प्रणाली कार्यान्वित
‘वर्धा जिल्हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. मी दरवर्षी दोनदा वर्ध्याला जाते. सेवाग्रामसह विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमलाही भेट देते. तेथे दरवेळी एक वेगळी शांतता, ऊर्जा आणि नवा विचार निश्चितच मिळतो. महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासह काम केलेल्या व्यक्तींची भेट होते. त्या सर्व मंडळींनी संघर्ष केला म्हणून आपण देशात मोकळा श्वास घेत आहोत. जिद्दीने काम करणारी अनेक कुटुंबे आजही वर्ध्यात आहेत. त्यामुळे वर्ध्याशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.