मुंबई : राज्याच्या प्रशासनातील सर्वात प्रतिष्ठेचे आणि अनन्यसाधारण महत्त्वाच्या अशा मुख्य सचिव पदावर विराजमान होण्याची संधी दोन वेळा हुकल्यानंतरही नाउमेद न होता गृह आणि सामान्य प्रशासन अशा दोन्ही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी समर्थपणे हाताळणाऱ्या, सुजाता सौनिक यांची अखेर रविवारी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. या पदावरील पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा आणि राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान मिळविण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील राज्यातील सर्वांत जेष्ठ अधिकारी असलेल्या सौनिक यांनी आपल्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे. सौनिक यांनी सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास, प्रशासन अशा अनेक विभागांत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या आणि राज्य तसेच केंद्र सरकारमध्ये विविध पातळीवर धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच कंबोडिया आणि कोसोवो येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार आणि संयुक्त राष्ट्रातही विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा >>> मुंबईत सरासरीपेक्षा ३५ टक्के पाऊस कमी, सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा

मूळच्या हरियाणातील असलेल्या सुजाता सौनिक यांनी आपले शालेय शिक्षण चंडीगड येथे पूर्ण केले तर पंजाब विद्यापीठातून इतिहास या विषयातून एमए केले आहे. सौनिक यांनी विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक पटकावले होते. सौनिक यांचे वडीलही भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी होते.

भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आयुक्त या पदावर काम केले. सध्या गृह व सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून काम करताना पोलीस दलात शिस्त आणतानाच काही नवीन प्रयोग त्यांनी केले. आपल्या स्पष्ट, निर्भिड आणि रोखठोक स्वभावामुळे प्रशासनात आपली वेगळी जरब निर्माण करणाऱ्या सौनिक यांनी सामान्य प्रशासन विभाग (सेवा), सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, वित्त विभागात वित्तीय सुधारणा आदी महत्त्वाच्या विभागांच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

परदेशातही ठसा

सौनिक यांनी केंद्रातही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सल्लागार आणि केद्र सरकारच्या सहसचिव, केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या कार्यकारी संचालक आदी पदांवर काम केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रात प्रतिनियुक्तीवर जात कोसोवो आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. कोसोवोमध्ये प्रिझरेन शहराचे नगर प्रशासक म्हणून काम केले. तसेच या युद्धग्रस्त प्रांताच्या पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठी पाठविण्यात आलेल्या पथकात काम करताना तेथे सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवले. तसेच दक्षिण पूर्व आशियातील कंबोडियामध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळीही संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून काम केले आहे.

प्रथमच प्रशासन,पोलीस प्रमुखपदी महिला अधिकारी

सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच प्रशासन आणि पोलीस दलाच्या प्रमुखपदी महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला आहेत. मुख्य सचिवपदी आता सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली आहे. कर्नाटकात असा प्रयोग पहिल्यांदा झाला होता. २०१७ मध्ये मुख्य सचिवपदी के. रत्नप्रभा तर पोलीस महासंचालपदी निलमणी एम. राजू या दोन्ही एकाच वेळी सर्वोच्चपदी होत्या.

दोघींची संधी हुकली

राज्यात मुख्य सचिवपदासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची संधी डावलली गेली होती. चंद्रा अय्यंगार आणि मेधा गाडगीळ या दोन्ही अधिकाऱ्यांची मुख्य सचिवपदासाठी ज्येष्ठता असतानाही तात्कालिक राज्यकर्त्यांनी त्यांना संधी न देता पुरुष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्याबद्दल महिला अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नापसंतीही व्यक्त केली होती. दोनदा संधी नाकारूनही अखेरीस नियुक्ती झाल्याने सुजाता सौनिक या नशीबवान ठरल्या आहेत.