सनदी अधिकाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता यंदा केंद्र सरकारने प्रथमच भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यांचे संख्याबळ विक्रमी १८० पर्यंत एवढे वाढविले आहे. राज्यातील अधिकाऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा लक्षात घेता संख्याबळ अधिक वाढवावे, ही महाराष्ट्राची मागणी मात्र मान्य होणार नाही. गतवर्षांच्या तुलनेत संख्याबळ फार तर एकाने वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) १८० तर भारतीय पोलीस सेवेत (आय.पी.एस.) १५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत १९९१ पूर्वी दरवर्षी १०० ते १२० अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची. १९९१ मध्ये देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण आखण्यात आले. परिणामी अधिकाऱ्यांची एवढी गरज भासणार नाही, असा युक्तिवाद तत्कालीन कार्मिक खात्याचे राज्यमंत्री व विद्यमान वित्तमंत्री पी. चिंदम्बरम यांनी केला होता. त्यानुसार प्रत्येक वर्षी अधिकाऱ्यांची संख्या घटत गेली. २००० मध्ये सर्वात कमी म्हणजे अवघे ५४ अधिकारी सेवेत दाखल झाले होते. तेव्हा आर्थिक सबब तत्कालीन भाजप सरकारने पुढे केली होती. अधिकाऱ्यांची चणचण भासू लागल्याने २००४ नंतर संख्याबळ वाढविण्यात आले. २००८ मध्ये १११ अधिकारी सेवेत दाखल झाले होते. गेल्या वर्षी १५१ अधिकाऱ्यांची नेमणूक झाली होती. सर्वच राज्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांची चणचण भासत असल्याने यंदा आय.ए.एस. अधिकाऱ्यांचे संख्याबळ वाढविण्यात आले.
महाराष्ट्रातील संख्याबळ कायम
राज्यात आय.ए.एस. अधिकाऱ्यांची ३५० पदे मंजूर असली तरी सध्या २८० अधिकारी सेवेत आहेत. म्हणजेच मंजूर जागांच्या तुलनेत ७० अधिकाऱ्यांची कमतरता आहे. गतवर्षी राज्याच्या सेवेत आठ अधिकारी दाखल झाले होते. रिक्त जागांचे प्रमाण लक्षात घेता हे संख्याबळ दरवर्षी १२ ते १४ करावे, अशी महाराष्ट्राची भूमिका होती. पण केंद्राने ती मान्य केलेली नाही.
देशातील सनदी अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याने राज्याच्या कोटय़ातील अधिकाऱ्यांची संख्या एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे. यंदा नऊ किंवा दहा अधिकारी राज्याच्या सेवेत दाखल होतील, असा अंदाज आहे. राज्याच्या सेवेतील ४० टक्के अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असावेत, असे प्रमाण केंद्राने निश्चित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या सेवेतील ७६ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणे आवश्यक असले तरी सध्या ३८ अधिकारीच केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.
‘यूपीएससी’मध्ये ठाण्यातील तिघे यशस्वी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षेत ठाण्यातील चिंतामणी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील तिघे यशस्वी झाले आहेत. चिन्मय पाटील (८०७), डॉ. पराग गवळी (५४६) आणि आदित्य प्रभुदेसाई (५१८) अशी तिघा यशस्वीतांची नावे आहेत. आदित्य प्रभुदेसाई गेल्या वर्षीही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. सध्या नागपूरात आयकर विभागात कार्यरत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा