मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या परीक्षेला (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) मंगळवार, १४ जानेवारी २०२५ पासून सुरुवात होत आहे. मात्र पदव्युत्तर स्तरावरील एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांच्या हातात प्रवेशपत्रच (हॉल तिकीट) आलेले नाही, तर काही विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरा प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे. या भोंगळ कारभारामुळे सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान परीक्षा केंद्रांवर गोंधळ आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.तसेच आसनव्यवस्थेबाबतही स्पष्ट माहिती नसल्यामुळे आणि परीक्षा केंद्रांवर ऐनवेळी विविध सूचना देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये आणि ‘सीडीओई’च्या अधिकृत टेलिग्राम खात्यावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र अनेक विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री ११ तसेच १२ नंतरही प्रवेशपत्र पात्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे किती विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही आणि त्यांना परीक्षेला मुकावे लागले? या गोंधळामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचलेच नाही? याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत असून शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच विद्यार्थी संघटनांकडूनही टीकेची झोड उठवली जात आहे.
हेही वाचा >>>मुंबईतून ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक; नववर्षातील पहिल्याच १० दिवसांतील पोलिसांची कारवाई
एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आयडॉलच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांचे प्रवेशपत्र आम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी आम्ही दिवसभर वारंवार संकेतस्थळ पाहत होतो. मात्र आता परीक्षेच्या अगोदरच्याच दिवशी रात्री उशीरा हे प्रवेशपत्र आम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. मात्र अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशपत्रापासून वंचित असून ते गोंधळलेल्या मनःस्थितीत आहेत.
‘पुन्हा एकदा आयडॉलचा भोंगळ कारभार समोर आला आहे. हा विस्कळीत कारभार पाहून आयडॉलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याची कुलगुरूंकडे गेल्या वर्षभरापासून मागणी करीत आहोत. मात्र या मागणीकडे सरार्स दुर्लक्ष केले जात आहे. विद्यापीठाला परीक्षांचे गांभीर्य आहे की नाही? हा विस्कळीत कारभार लवकरात लवकर सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.