मुंबई : पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर देताना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) वापरून मूर्ती साकारणे तसेच पर्यावरणाला हानिकारक कृती सुरू ठेवणे याचा मूलभूत अधिकार मूर्तीकारांना नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने मंगळवारी केली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) मूर्ती विसर्जनाबाबत प्रसिद्ध केलेल्या २०२० सालच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना ठाणेस्थित श्रीगणेश मूर्तीकार उत्कर्ष संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, पीओपी मूर्तींवरील बंदी घटनेने दिलेल्या समानता, व्यवसाय करण्याच्या, जगण्याच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या तसेच मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा मूर्तीकारांच्यावतीने याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केला गेला. सीपीसीबीने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना कायदा मानले जाऊ शकत नाही, असा दावा देखील याचिकाकर्त्यांनी केला. तथापि, मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने पीओपी वापरून मूर्ती बनवण्याचा व पर्यावरणाला हानिकारक कृती सुरू ठेवण्याचा मूलभूत अधिकार मूर्तीकारांना नसल्याची टिप्पणी केली.
मार्गदर्शक तत्त्वे कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. शिवाय, यापू्र्वी न्यायालयाने या पैलूंचा विचार केलेला नाही, असा युक्तिवादही मूर्तीकारांच्या वतीने करण्यात आला असता एखाद्या प्रश्नाबाबत विशिष्ट कायदा अस्तित्वात नाही, तेथे मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाऊ शकतात आणि ती लागू केली जाऊ शकतात, असे मुख्य न्यायमूर्ती आराधे यांनी प्रामुख्याने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, पीओपी बंदीला मान्यता देणाऱ्या आधीच्या निर्णयांचा संदर्भ देखील दिला. मूर्ती विसर्जनाबाबत सीपीसीबीने २०२० मध्ये केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची वैधता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) ५ जुलै २०२१ रोजी कायम ठेवली. नंतर २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
याशिवाय, पीओपी मूर्तींवरील बंदीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने जुलै २०२२ मध्ये फेटाळून लावली होती. मद्रास उच्च न्यायालयानेही १७ सप्टेंबर २०२३ रोजी या मुद्याबाबत निर्णय देताना कोणालाही पीओपी वापरून मूर्ती साकारण्याचा अधिकार नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तसेच, पीओपी मूर्तींचे उत्पादन, विक्री आणि विसर्जनाविरोधात अंतरिम आदेश दिला होता हेही मुख्य न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने मूर्तीकारांना त्यांचे म्हणणे पटवून देण्यास सांगताना स्पष्ट केले. यावेळी प्रकरणात केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची मूर्तीकारांची विनंती न्यायालयाने मान्य केली आणि याचिकेवरील पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी ठेवली.दरम्यान, ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी पीओपी मूर्ती बंदीच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जनहित याचिका केली होती. त्यावर ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकार आणि महानगरपालिकेला गणेशोत्सवासाठी पीओपी बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक गणेश मंडळांना २०२० च्या सीपीसीबी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल याची माहिती देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
© The Indian Express (P) Ltd