येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत असून करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता गणेश आगमनानिमित्त होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. परिणामी, भाविकांनी गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवस आधीच कार्यशाळांमधून गणेशमूर्ती घरी आणावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर वर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासून गणेश आगमन होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी तर वाजतगाजत गणेश आगमनाच्या मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी अवघी मुंबापुरी गणेशमय होते. मात्र यंदा करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अंतर नियमाचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भाविकांनी यंदा गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवस आधीच गणेश कार्यशाळांमधून गणेशमूर्ती घरी आणावी. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही ही बाब विचारात घेऊन गणेश आगमन करावे, असे आवाहन पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात केले आहे.

मुंबईमध्ये ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. मात्र नैसर्गिक विसर्जन स्थळांपासून दोन कि.मी. अंतरावर राहणाऱ्या भाविकांनीच तेथे गणेश विसर्जन करावे. तेथे पोहोचल्यावर गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात द्यावी, पालिकेकडून गणपतीचे विसर्जन करण्यात येईल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन पालिकेने यंदा पाचपट अधिक म्हणजे १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये तात्पुरती विसर्जन स्थळे उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. फिरत्या विसर्जन स्थळांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळून गणेश विसर्जन करावे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मूर्ती संकलन केंद्रे  : यंदा प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मैदाने, काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप, विभाग कार्यालय अशा ठिकाणी सात ते आठ फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. भाविकांनी या संकलन केंद्रात गणेशमूर्ती जमा करावी. तसेच विसर्जनापूर्वीची आरती घरीच करावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.